
जळगाव: १०.०५.२०२६
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम क्षेत्राचा (महाराष्ट्र, गोवा व गुजरात) 'कार्यकर्ता विकास वर्ग-१' यावर्षी जळगाव येथील के सी ई सोसायटीच्या एम. जे. कॉलेज च्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. दिनांक १० मे ते ३० मे २०२६ या कालावधीत हा वर्ग संपन्न होणार असून, यात तीन राज्यांतील ३०० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी असे संघ शिक्षा वर्ग आयोजित करण्यात येतात. यावर्षी जळगांव येथे हा वर्ग होत आहे.
*प्रशिक्षणाचे स्वरूप आणि शिस्त*
२१ दिवसांच्या या निवासी वर्गामध्ये स्वयंसेवकांना शारीरिक, बौद्धिक, संघटनात्मक, व्यवस्थापकीय आणि सेवा कार्याचे सखोल प्रशिक्षण दिले जाईल. पहाटे ४.३० वाजता जागरण होऊन रात्री १०.०० वाजेपर्यंत विविध सत्राच्या माध्यमातून वर्ग सुरू असतो. सहभागी शिक्षार्थींना घोष वादनाचे सुद्धा प्रशिक्षण या काळात देण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून वर्ग परिसरातून एक दिवस सघोष संचलन काढण्यात येणार आहे. हा वर्ग केवळ प्रशिक्षण नसून ती एक 'साधना' व कठोर अनुशासनाचा भाग मानले जाते. तसेच या वर्गाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथील संपूर्ण व्यवस्था 'पर्यावरणपूरक' असणार आहे. प्लास्टिकचा वापर टाळून निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
*अखिल भारतीय अधिकाऱ्यांचा प्रवास*
या वर्गासाठी रा.स्व.संघाचे सरकार्यवाह दत्तात्रयजी होसबळे, सह सरकार्यवाह अरुण कुमारजी, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मा. मंगेशजी भेंडे यांचे शिक्षार्थींना विशेष मार्गदर्शन मिळेल. तसेच अन्य क्षेत्र अधिकाऱ्यांचा सुद्धा प्रवास या वर्गात होईल. वर्गधिकारी सुधीरजी चापोरकर आहेत.
*लोकसहभागातून सिद्धता*
या वर्गामध्ये समाजातील सर्व स्तरातील सज्जनशक्तीचा सहभाग राहणार आहे. जळगाव शहरातील अनेक संस्था संघटना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या वर्ग व्यवस्थापनात सहभागी आहेत. कार्यकर्ता विकास वर्ग हा खऱ्या अर्थाने समाजाचा आणि समाजासाठीचा आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षणाथींच्या भोजनासाठी लागणाऱ्या हजारो पोळ्या (चपात्या) दररोज शहरातील विविध कुटुंबांकडून संकलित केल्या जाणार आहेत. भोजन व्यवस्था आणि पोळ्या संकलनाच्या या कार्यात जळगावमधील मातृशक्तीचा मोठा सहभाग असणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या राष्ट्रकार्याशी जोडण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे.
*समारोप कार्यक्रम विशेष*
या वर्गाचा समारोप ३० मे रोजी सायंकाळी होईल. यावेळी २१ दिवसांच्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक शिक्षार्थी सादर करतील. या समारोप कार्यक्रमात जळगांव शहरातील नागरिक, माता, भगिनी यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन रा.स्व.संघाने केले आहे.
या प्रशिक्षण वर्गामुळे कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सेवावृत्ती अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
