१९५२ च्या निवडणुकीत मुंबईत द्विसदस्यीय मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब व अशोक मेहता ही जोडी उभे होती. त्या निवडणुकीत दोघेही पडले, पण लक्षात असे आले की, अशोक मेहता व त्यांचा समाजवादी पक्ष सवर्ण हिंदूची मते आंबेडकरांकडे वळविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. बाबासाहेबांचा १४ हजार ३७४ मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसचे नारायण काजरोळकर यांनी १ लाख ३७ हजार ९५० मते घेतली, तर बाबासाहेबांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली होती. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांत ही भावना पसरली की अस्पृश्य व स्पृश्य त्यांच्यात कधी न तुटणारी तटबंदी आहे. इकडची मते तिकडे जाऊ शकत नाहीत व तिकडची मते इकडे येऊ शकत नाही. कथित स्पृश्य व अस्पृश्यांमध्ये दरी वाढवणारी ही बातमी दत्तोपंतांकडून कळली त्यावेळी श्रीगुरुजी खूप चिंतित झाले.
याच दरम्यान १९५४ साली भंडारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आली. त्यातही तीच जोडी समोर आली, डॉ. आंबेडकर व अशोक मेहता. दविसदस्यीय मतदार संघ असल्यामुळे मतदारांना एकाच वेळी दोन उमेदवारांना मत द्यावे लागणार होते. त्यावेळी फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची एक बैठक झाली. भंडारा मतदार क्षेत्रांत अस्पृश्यांची संख्या भरपूर होती. तरी केवळ अस्पृश्यांच्या मतांच्या आधारावर बाबासाहेब निवडून येऊ शकत नव्हते. हेही स्पष्ट होते. अस्पृश्य मते अशोक मेहतांकडे जातील, आपण अशोक मेहतांचे एकही मत आपल्याला मिळणार नाही ही सर्वांची खात्री होती.
तरी पण आपले दुसरे मत अशोक मेहतांना द्यावेच लागेल कारण दूसरा कोणताही पर्याय नव्हता. असे झाले तरी मुंबईप्रमाणेच याही वेळी होईल. फार तर अशोक मेहता निवडून येतील, पण बाबासाहेब मात्र हरतील. म्हणून बैठकीत असा निर्णय झाला की, आपण आपले दुसरे मत गोठवू. (म्हणजे दुसरे मत द्यायचेच नाही)
ही बैठक चालू असताना बाबासाहेब तेथे आले. त्यांनी विचारले, “काय चर्चा चालू आहे? त्यांना सांगण्यात आले की आम्ही दुसरे मत गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण असे जर केले नाही तर तुम्ही हराल. हे ऐकून बाबासाहेब नाराज झाले. ते म्हणाले, “मी हरणे पसंत करीन, पण तुम्हा लोकांना दुसरे मत गोठवण्याची परवानगी देणार नाही. मी भारतीय घटना तयार केली. त्या घटनेच्या तरतुदींचा अवलंब करताना असं गैरप्रकार कधीही सहन करणार नाही.” मग पुन्हा तोच प्रश्न आला की मत तर कुणाला द्यायचे?
त्यावेळी असे मत मांडण्यात आले की दुसऱ्या कोणत्या तरी सवर्ण व्यक्तीला उभे करून त्याला दुसरे मत देऊ. त्या बैठकीत दत्तोपंत स्वत: हजर होते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे नाव पुढे आले. बाबासाहेबांनी दत्तोपंत यांना उभे राहण्याविषयी विचारणा केली. पण दत्तोपंत संघ प्रचारक असल्याने निवडणुकीला उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. ते म्हटले, “माझ्या जवळ पैसे वा इतर साधणे नाहीत.” बाबासाहेब म्हणाले, “ते सर्व आम्ही बघून घेऊ.” त्यावर दत्तोपंत म्हणले,“याविषयी मला माझ्या लोकांना विचारावे लागेल.” त्यानंतर दत्तोपंतांनी पू. गुरुजींच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या. श्री गुरुजींना ही स्पृश्य अस्पृश्य यांना एकत्र करण्याची योग्य संधि वाटत होती, परंतु दत्तोपंत किंवा संघाचा कोणीही कार्यकर्ता उभा राहिला तर असा संदेश जाईल की संघाचा माणूस उभा आहे म्हणून हे पाठिंबा देतात. म्हणून श्री गुरुजींनी सल्ला दिला की “तू स्वत: निवडणूक लढवू नकोसच, परंतु आपल्यापैकी कोणालाही निवडणुकीला उभे राहू देऊ नकोस. त्याऐवजी तु स्वत: भंडारा मतदारसंघातील आपले सर्व कार्यकर्ते पूर्णशक्ति पणाला लावून बाबासाहेबांसाठी प्रचार करा. संघाचे लोक बाबासाहेबांसाठी प्रचार करीत आहेत ही गोष्ट बाबासाहेबांच्या व इतर लोकांच्या ध्यानात आली पाहिजे, असे होण्याने आपल्याला अभिप्रेत असलेल्या सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने अपेक्षित कार्य होईल.
त्यानुसार ठरले व भंडारा जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवक बाबासाहेबांच्या प्रचारकार्यासाठी प्राणपणाने हिंडू लागले. अर्थातच या निवडणुकीत बाबासाहेब जरी हरले तरी त्यांनी जेव्हा आकड्यांचे विश्लेषण केले; कुठून किती मते मिळाली ते पडताळून पाहिले, तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की, त्या संसदीय क्षेत्रांत अस्पृश्यांची एकूण जितकी मते होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मते त्यांना मिळाली आहेत. सवर्णातीलही अनेकांनी त्यांना मतदान केले आहे. त्यामुळे त्यांना समाधान वाटले.
पुढे नागपुरातील दीक्षाविधीच्या दुसऱ्या दिवशी नागपुरातील शे. का. फेडरेशनचे पुढारी त्यांना भेटायला आले. त्या मंडळींना बाबासाहेब म्हणाले, “तुम्हा लोकांना राजकारणात अधिक रुचि आहे. मला धर्मांत अधिक रुचि आहे. मी भंडाऱ्याची निवडणूक हरलो त्याचे मला दू:ख नाही, कारण मी हारणार याची मला सुरुवातीपासूनच कल्पना होती, परंतु मला एक गोष्ट फार चांगली वाटली. अस्पृश्य आणि सवर्ण समाज यांच्यामध्ये मला तटबंदी दिसत होती ती या भंडाऱ्याच्या निवडणुकीत तुटून गेली. या निवडणुकीत मला अस्पृश्यांव्यतिरिक्त सवर्णाचीही बरीच मते प्राप्त झाली. यापुढे आपण आपला विचार बदलला पाहिजे. केवळ अस्पृश्य व मागासवर्गीयांसाठीच संघटन न बनवता आम्हाला सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम बनविले पाहिजेत.” याचाच परिणाम म्हणजे शेकाफे पक्षाऐवजी रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली.
संदर्भ: 1) ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, लेखक - दत्तोपंत ठेंगडी, पृष्ठ क्रमांक १२९, १३०
2)प्रा. वामन तुरिले, निवडणुकीचे साक्षीदार
Farah chhan maritime.
Chandrakant Mahajan
20 Dec 2024 15:22