महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव व पंढरपूरची आषाढी एकादशी 'लोकोत्सव' आहेत. शिवजयंती उत्सवात सर्व समाज मोठ्या हिरीरीने सहभागी होत असतो. तर पंढरपूरच्या वारीमध्ये "ज्ञानबा- तुकाराम" गजर करीत शहरी ते ग्रामीण भागातील हजारो दिंडया व लाखो वारकरी "ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ,वैकुंठीचा राणा डोळ्याने पाहू" म्हणत पंढरपूरच्या दिशेने पायी,अनवाणी चालत भक्तिमय होतो. शिवजयंती लोकशक्तीचा तर पंढरपूरची वारी लोकभक्तीचा उत्सव आहे. परंतू गेल्या काही दशकापासून शिवजयंती उत्सवात खोटा इतिहास सांगून वाद निर्माण करण्यात येत आहे, त्याचप्रमाणे पंढरपूरच्या वारीमध्ये काही विघातक मंडळीनी संभ्रम व अफवा अशा वेगवेगळ्या षडयंत्राचे प्रयोग करून वारीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवजयंती उत्सवमध्ये शिवजयंती इंग्रजी तारखेप्रमाणे की तिथीनुसार असा प्रयोग व खोटे तथ्य अर्धवट संदर्भ देऊन शिवभक्तामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचप्रमाणे आता पंढरपूरच्या वारीमध्ये जातीपातीचे आणि इतर षडयंत्राचे प्रयोग करून पंढरपूर वारीला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे.
महाराष्ट्र व देशातील राजकीय आश्रित असलेल्या अनेक समाज विघातक संघटना "मुक्ती तत्वज्ञान" संस्था, बोगस टोळ्याच्या कार्याचा मागोवा घेतल्यास अनेक वर्षापासून हिंदू समाजाचे सणउत्सव, हिंदूसमाजाचे प्रेरणास्थान व दैवत, महापुरुषांच्या जयंती, पुण्यस्मरणच्या निमित्ताने हिंदू समाजात बुद्धिभेद निर्माण करण्याचे किंवा हिंदू समजाची दिशाभूल करून जातीपातीमध्ये विभागण्याचे षडयंत्र करीत असल्याचे लक्षात येत आहे व त्यामंडळी काही अंशी त्यांच्या षडयंत्राच्या प्रयोगमध्ये यशस्वी होत असल्याचे सुध्दा दिसून येत आहे.
महाराष्ट्राचा विचार केल्यास ज्या संत, महात्मे, महापुरुषांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे, समाजाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवले त्यांच्या जयंती, पुण्यतिथी उत्सवमध्ये दुर्दैवाने केवळ त्याच समाजाची, त्याच जातीची माणसं दिसतात. सर्व समाज त्यामध्ये सहभागी होत नाही. महापुरुष आणि संत यांच्या जयंती, पुण्यतिथीचे उत्सव समाजाचे नव्हे तर एका ठराविक जातीचे उत्सव ठरतात हे विदारक सत्य समाजात आता स्पष्ट दिसत आहे.
महाराष्ट्रात काही समाजविघातक मंडळीनी शिवजयंती उत्सवात समाज प्रबोधनाच्या गोंडस नावाखाली वादविवाद निर्माण करण्यासाठी अनेक खोट्या इतिहासाचे,अर्धवट संदर्भ देऊन भांडवल केलेल आहे. समाजाला संभ्रमित करण्यासाठी प्रचंड प्रमाणात संदर्भहीन साहित्य सुध्दा निर्माण केलल आहे. शिवरायांच्या सैन्यात ५७ तक्के मुस्लिम सैन्य होते असा कांगावा करून मुळातच हिंदुनिष्ठ व सहिष्णू असलेल्या शिवरायांना धर्मनिरेक्ष ठरविण्याचा खोटा इतिहास प्रस्तुत करून वैचारिक गोंधळ निर्माण केला आहे. वास्तविक पाहता शिवकालीन इतिहासाच्या कोणत्याही बखरी वा समकालीन संदर्भ तपासले तर शिवरायांच्या सैन्यात बोटावर मोजण्या इतकेच मुस्लिम होते हा सत्य इतिहास आहे. त्यातही अनेकांनी दगाबाजीच केली आहे. महाराजांनी त्यांना नंतर कुठलेही महत्वाचे पद दिलेले नाही. परंतू समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी उपरोक्त प्रमाणे कांगावा केला जातो. तसेच शिवजयंती इंग्रजी तारखेप्रमाणे की तिथीनुसार असा वाद निर्माण करून शिवभक्तामध्ये उभी फूट पाडण्याचा प्रयत्न सुद्धा सतत केला जातो. आपल्या देशात सर्व पंथातील महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी तिथीनुसार करण्याची परंपरा आहे. भगवान गौतम बुद्ध ,भगवान महावीर महात्मा बसवेश्वर, विश्वकर्मा अग्रसेन, गुरू नानक पासून गुरू गोविंदसिंग तसेच ज्ञानेश्वर माऊली पासून संत तुकाराम महाराज यांच्या स्मरणाचे उत्सव तिथी प्रमाणे साजरे केले जातात, पण शिवजयंती इंग्रजी तारखे प्रमाणे साजरी करून शिवभक्तांमध्ये उभी फूट पाडण्याचे षडयंत्र केले जाते.
शिवजयंतीप्रमाणे आता या विघातक शक्ती पंढरपूर वारीला टार्गेट करीत असल्याचे लक्षात येत आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने हजारो दिंड्या येतात. ज्ञानबा- तुकारामचा गजर करीत भगवी पताका खांद्यावर घेऊन लाखो वारकरी पंढरपूरला येत असतात. त्यामुळे पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी वारकरी बंधूना जातीपातीत विभागण्याचा प्रयत्न सुध्दा केला जातो. वारकरी संप्रदायमध्ये टाळकरी- माळकरी, तुकोबांना मानणारे, ज्ञानोबा माऊलीना मानणारे असे भेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू झालेला आहे. सोबतच पंढरपुरात येणाऱ्या संत एकनाथ ते नामदेव महाराज व ज्ञानेश्वर माऊली ते तुकोबांच्या पालख्यां मध्ये "ज्ञानबा तुकाराम" नव्हे तर "नामदेव तुकाराम" गजर करण्याचा प्रयत्न करून वारकऱ्यामध्ये जातीपातीचा गोंधळ निर्मण करण्याचा प्रयत्न केला आहे. वारी मध्ये"अल्ला देवे--अल्ला करे सो होय" अभांगाचा प्रयोग संभ्रम निर्माण करण्याच्या षडयंत्राचा भाग होता. तसेच वारकरी बंधूमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी तुकोबा "वैदिक की विद्रोही-तुकारामाचे वैकुंठ गमन की हत्या"असा वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहेच.
मागील वर्षीच्या वारी मध्ये तुकोबांचा खालील अभंग मोठ्या प्रमाणात मीडिया ते सोशल मीडियात जाणीवपूर्वक फिरवून वारकरी बंधुत संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. अल्ला देवे , अल्ला दिलावे, अल्ला दारू, अल्ला खिलावे, अल्ला बगर नही कोये, अल्ला करे सो ही होये !! असा तो कथित अभंग.
आपल्या देशाचा पाया अध्यात्म असून सर्व संतांनी समाजात सतत "भेदा भेद भ्रम अमंगळ - विश्व ची माझे घर" असे उदात्त व सर्वसमावेशक सहिष्णू विचार दर्शन मांडले आहे. सर्व संताच्या प्रार्थना मानव उत्थानाच्या व लोकमंगल कामनेच्या राहिलेल्या आहेत. संत तुकोबांनी आपल्या जवळपास ४००० अभंग असलेल्या गाथेच्या माध्यमामधुन समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर भाष्य केलेल आहे. वेदशास्त्र पासून ज्ञान अध्यात्म व ज्ञान विज्ञान ते पर्यावरण अशा विविध पैलूचे महत्व सुध्दा विशद केले आहे. केवळ"अल्ला देवे-अल्ला करे सो होय" एवढंच सांगितले नाही. परंतू ज्या प्रमाणे गेल्या दोन तिन शतका पासून महाराष्ट्रात चुकीचा खोटा इतिहास मांडून शिवरायांची धर्मनिरपेक्ष व मुस्लिमधार्जिणे अशी प्रतिमा उभी करण्यासाठी चढाओढ लागली आहे, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपरोक्त अभंग खोडसाळ बुद्धीने प्रस्तुत करून तुकाराम महाराज मुस्लिम धार्जिणे, मुस्लिम सुफी संत परंपरा मानणारे किंवा अल्लाची भक्ती करणारे होते, असा चेष्टा करणारा गैरसमज निर्माण करणारा प्रयोग झालेला आहे. वारकरी संप्रदायमध्ये असे संभ्रम निर्माण करणारे प्रयोग करून वारकरी जातीपंथात कसा विभागला जाईल, दुफळी कशी निर्माण केली जाईल यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. एकूणच काही समाज विघातक मंडळी पंढरपूर वारीमध्ये घुसल्या असून त्यांनी वारकरी बंधूंना फोडण्यासाठी षडयंत्रांचे सर्व प्रयोग ठरवून व सुनियोजितरीत्या करण्यास सुरुवात केली आहे. तसेच वारी मधिल सामाजिक समरसता व सामाजिक एकतेचे विशाल दर्शन विघातक मंडळीच्या डोळ्यात सतत खुपत असल्याने त्यांना सामाजिक एकतेचा कणा मोडायचा आहे म्हणूनच त्यांनी पंढरपूर वारीला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
महाराष्ट्रात होत असलेल्या शिवजयंती उत्सवामध्ये किंवा पंढरपूरच्या वारीमध्ये कोणीही व कधीच जातीपातीचा विचार करीत नाही. शिवजयंती मध्ये सामील झालेला प्रत्येक माणूस स्वतःला शिवरायांचा मावळा व पंढरपूरच्या वारी मध्ये सामील झालेला प्रत्येक माणूस स्वतःला केवळ ‘वेदशास्त्रमाहेर विठोबाचा वारकरी’ समजतो हे पक्क समीकरण आहे. त्यामुळे विघातक शक्तीन्ना हिंदू समाजातील सामाजिक एकतेच समीकरण बिघडविण्यासाठी तसेच वारकरी संप्रदायमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. भविष्यात त्यांचे प्रयत्न तीव्र केले जातील याची जाणीव ठेऊन समाज विघातक मंडळी यशस्वी होणार नाहीत याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. वारकरी बंधु भगिनींनी अश्या वारकरी बनून आलेल्या समाज विघातक लोकांना ओळखून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे.
लेखकाने मांडलेले विचार वास्तविक
आहेत. काही वर्षापासून काही तथाकथित लेखकांनी परकीय ख्रिश्चन, मुस्लिम संस्थाकडून पैसे घेऊन चुकीचे लिखाण केले, त्याला स्वतः चे कुठलेही ज्ञान, वाचन नसलेल्या लोकांनी ब्राह्मण जातीला विरोध करण्यासाठी सावरकर, चाफेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके ,रामदास स्वामी यांनाही सोडले नाही. ज्यांना श्री शिवाजी महाराजांच्या पायाखालील धुळीतील
एका कणाएवढीही अक्कल नसलेले लोक बळी पडले. हे थांबले पाहिजे.
Sulabha Khanage
18 Feb 2025 13:37
लेख छान आहे .सत्य परथिती आहे .
विनोद सगर
08 Jul 2024 15:09
वरील लेखांमध्ये जे वाक्य आलेले आहे "शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम, जैन व बौद्ध सुद्धा होते. " यामध्ये केवळ मुस्लिम होते एवढाच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होत आहे.आपण केलेला जैन व बौद्ध हा उल्लेख संयुक्तिक वाटत नाही. जैन व बौद्ध हे हिंदूच आहेत. त्यामुळे त्यांचा वेगळा उल्लेख करून त्यांना अन्य धर्मीय ठरवण्याचा कळत नकळत गैरसमज निर्माण होऊ शकतो. यापूर्वी असा उल्लेख कुठेही आलेला नव्हता.आपणही तो टाळलेला बरा. न केलेला बरा असे वाटते
प्रमोद अच्युतराव बाकलीकर
01 Jul 2024 18:13
अतिशय परखड मत मांडले असून सेक्युलरवाद्यांचे असे बोगस धंदे थांबले पाहिजेत.
Pramod Rahate
01 Jul 2024 18:11