भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस कराड येथे (जिल्हा सातारा) भेट दिली त्यावेळी आपल्या भाषणात त्यांनी हे विधान केले आहे. ( संदर्भ – केसरी वृत्तपत्रातील बातमी, दिनांक ०९ जानेवारी १९४०)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संघाच्या शाखेस भेट दिली होती याबद्दल नुकताच एक अस्सल पुरावा समोर आला आहे. त्यानुसार दिनांक ०२ जानेवारी १९४० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे कराड येथे गेले होते. तेंव्हा त्यांनी संघाच्या शाखेस भेट दिली व तेथे उपस्थित संघ स्वयंसेवकांच्या समोर भाषण सुद्धा केले. या भाषणात त्यांनी म्हटले की, "कांही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातों," या भेटी बाबतची बातमी केसरी वृत्तपत्रात दिनांक ०९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली. या बातमीत पुढील प्रमाणे माहिती आहे.
"- ता.२ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब अंबेडकर हे कऱ्हाड येथे गेले असतांना तेथील म्युनिसिपालिटीत मानपत्र देण्याचा समारंभ झाला. यानंतर त्यांनी तेथील रा.स्व.संघाच्या शाखेस भेट दिली. याप्रसंगी भाषण करतांना डॉ. आंबेडकर म्हणाले, 'कांही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पहातों,”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीभेद, विषमता विरहित हिंदू संघटन करण्याचे कार्य गेली ९८ वर्षे करत आहे. अत्यंत प्रामाणिकपणे जातीच्या भिंती तोडून समाज जोडण्याचे काम संघ स्थापनेपासून करीत आला आहे. डॉ आंबेडकरांनी संघाबद्दल जो आपलेपणा व्यक्त केला आहे तो याच प्रामाणिक कामाची पावती आहे.
संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी पुण्यात १९७४ मध्ये वसंत व्याख्यानमाले मध्ये “सामाजिक समता व हिंदू संघटन” या विषयावर व्याख्यान दिले. या मध्ये अतिशय प्रागतिक सामाजिक भूमिका मांडली आहे. ".... आता बेटी व्यवहार (आंतरजातीय विवाह) सर्रास व्हावा. अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel! ती सर्वतोपरी गेली पाहिजे. ती संपूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे. If untouchability is not wrong. nothing in the world is wrong!" अस्पृश्यता वाईट नसेल तर मग जगात काहीच वाईट नाही! आज जी जातिव्यवस्था आहे , ती अव्यवस्था आहे. ती विकृती आहे.... जी जाऊ घातली आहे. ती आता नीट कशी जाईल याचाच सर्वांनी विचार केला पाहिजे. जे अस्पृश्यता-जातिभेद पाळतात, त्यांच्याकडे गेले पाहिजे. त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे ही आपली जबाबदारी आहे. जे असले भेद मानतात त्यांच्यावर तुटून पडण्यापेक्षा, संघर्ष निर्माण करण्यापेक्षा, त्यांना भेटायचे, त्यांच्याकडे जाऊन समजावून सांगायचे हे केले पाहिजे. असे करणे हाही कामाचा एक प्रकार होऊ शकतो. कारण हे सर्व बंधू आपलेच आहेत आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झाले पाहिजे असा आपला प्रयत्न आहे.... ," असे बाळासाहेब देवरसांनी स्पष्टपणे मांडले.
यानुसारच संघ काम करत आहे. मात्र रा. स्व. संघाबद्दल विरोधकांनी अतिशय गैरसमज समाजात पसरवलेले आहेत. असे पुरावे समोर आल्याने संघाची प्रामाणिक भूमिका समोर येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाजसुधारणेचे काम संघ १९२५ पासूनच करत आला आहे. संघाची कार्यपद्धती मात्र भिन्न राहिली आहे. संघटना म्हटले कि काही मर्यादा, कमतरता, अडचणी या असणारच. अनेक जाती-जमाती, समाज घटकांचा विशाल हिंदू समाज संघटीत करताना, विविध स्तरातील हिंदूंना एकत्रित करून कार्य पुढे नेताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. कधी मोठे यश येते. तर कधी त्रुटी राहतात आणि त्यातूनही समज, गैरसमज, मतभेद, वाद निर्माण होतात. पण यावर हळू हळू मात करून, आपल्यातील त्रुटी दूर करत संघ प्रामाणिकपणे बंधुत्वाच्या भावनेने पुढे जात आहे.
काही बाबतीत मतभेद असूनही डॉ आंबेडकरांनी कराड येथील संघ शाखेतील भाषणात संघाबद्दल व्यक्त केलेला आपलेपणा आजही सर्व स्वयंसेवकांना ऊर्जा देणारा आहे. संघाचा कोणी द्वेष करत असेल तर त्याच्या मनात आपल्याबद्दल हाच आपलेपणा निर्माण व्हावा म्हणून आपण काम करत राहू. देशविघातक, फुटीरतावादी, संविधान विरोधी लोकांच्या विरोधात आपले काम सुरू आहेत आणि राहील. द्वेषपूर्ण भावना मनात ठेवून कोणते सामाजिक कार्य वाढू शकणार नाही. सामाजिक कार्यात वैचारिक मतभेद असले तरी द्वेष न करता आपलेपणाची भावना सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये असणे गरजेचे आहे.
हा आपलेपणा, बंधुभाव आणि सोबत चिकाटी, समन्वय संघाने सोडला नाही म्हणून आज संघ विविध क्षेत्रात विस्तारला. यामध्ये कुटुंबाचा व भौतिक सुखांचा त्याग करून अहोरात्र काम करणारे संघ प्रचारक यांचा वाटा मोठा आहे. डॉ आंबेडकर आज असते तर संघाची शताब्दीकडे होणारी वाटचाल पाहून त्यांनी आजही संघाबद्दल आपलेपणा व्यक्त केला असता याची खात्री वाटते. पण अजून खूप काम बाकी आहे. अंतर्गत, बाह्य आव्हाने मोठी आहेत. सामाजिक समतेचे हे काम समन्वय, आपलेपणा व सुसंवादाने आणखी वाढेल यात शंका नाही.
(टीप : सदर बातमी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होतो. डॉ आंबेडकर संघाबद्दल आपलेपणा दाखवत हे काहींना पचत नाही. काहींना ही फेक न्यूज वाटू शकते. म्हणून आमचे मित्र वकील रिषभ परदेशी यांनी रीतसर अर्ज करून दैनिक केसरी येथून ०९ जानेवारी १९४० रोजीचा अंक मिळवला आहे. कोणीही या बातमीच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही)
समाजातील समरसता एकता कायम राखण्यासाठी बाबासाहेबांचे शब्द कमी येऊ शकतात
बाबासाहेब कमलाबाई बालासाहेब
16 Apr 2025 02:49
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कराड येथील संघशाखेला भेट दिल्या नंतर व्यक्त केलेले मत एका खऱ्या अर्थाने भारतमाते वर निस्सिम प्रेम करणाऱ्या महात्म्याचे आहे . ऑबेडकर वादयांनी संघ जाणून घ्यावा . डॉ हेडगेवार व डॉ आम्बेडकरांना या देशात समता स्वातंत्र्य बंधुता आणून समग्रदेश एकसुत्रात बांधायचा होता .मार्ग भिन्न होते . परंतू दोघांचेही लक्ष एकच होते हे यावरून दिसते .
डॉ प्रमोद लाखे
14 Apr 2025 19:40
खूपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती ????????,
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि संघाच्या बाबतित
वैभव अरविंद भगत
26 Dec 2024 00:20