जगभरात महिला कठोर परिश्रम करून उच्च पदावर पोहोचत आहेत.महिलांच्या स्थितीत बदल घडवून आणण्यात इतिहासातील अनेक जणांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यातीलच एक म्हणजे पाश्चात्य वैद्यक शास्त्रातील पहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी.
ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्या काळात वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी परदेशात जाऊन भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनण्याचे श्रेय आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना आहे.

बालविवाह
आनंदीबाई जोशींचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याणला झाला. त्या काळातील सामाजिक पद्धतीनुसार त्यांचा विवाह बालवयातच झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झाले. गोपाळराव आनंदीबाईंपेक्षा २० वर्षांनी मोठे होते. ते कल्याणच्या डाक विभागात कारकून होते. लग्नानंतर प्रथेप्रमाणे गोपाळरावांनी पत्नीचे यमुना नाव बदलून ‘आनंदी’ असे ठेवले.
पतीचा पाठींबा आणि प्रेरणा
गोपाळराव स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे, या विचारांचे होते. वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, वैद्यकीय मदतीच्या आणि वैद्यकीय संसाधनांच्या,सुविधांच्या कमतरतेमुळे ते बाळ फक्त दहा दिवसच जगले. ही गोष्ट त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली, या घटनेतूनच त्यांनी डॉक्टर होण्याची प्रेरणा घेतली.
सामाजिक अडथळे
आनंदीबाईंना शिक्षण घेताना अनेक सामाजिक अडथळे आले. गोपाळरावांची मुंबईला बदली झाल्यावर तिथे आनंदीबाई शाळेत जाऊ लागल्या. संस्कृत भाषेत पारंगत असण्याप्रमाणेच लोकहितवादींची शतपत्रे वाचल्यानंतर, इंग्रजी भाषा शिकणे जास्त व्यावहारिक आहे, असे गोपाळरावांना वाटले. त्यांनी १८८० मध्ये अमेरिकन मिशनरी रॉयल वाइल्डर यांना पत्र लिहून आनंदीबाईंना अमेरिकेला येऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा आहे हे कळविले. आपल्यासाठीही योग्य नोकरीची सोय होऊ शकेल काय, यासंबंधीही विचारले. मात्र, या दोघांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तरच हे शक्य आहे, असे वाइल्डर यांनी कळवले आणि मदत करण्यास होकार दिला. मात्र, हा प्रस्ताव जोशी दाम्पत्याला मान्य झाला नाही. वाइल्डर यांनी जोशी दाम्पत्यासोबत झालेला हा पत्रव्यवहार प्रिन्स्टनच्या मिशनरी रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध केला. हा पत्रव्यवहार रोसेल (न्यू जर्सी) इथे राहणाऱ्या थिओडिशिया कारपेंटर यांच्या वाचनात आला. प्रभावित होऊन त्यांनी आनंदीबाईंना पत्र लिहिले आणि त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्याची सुविधा देण्याची तयारी दर्शवली. या दोन स्त्रियांमध्ये त्यावेळी बराच पत्रव्यवहार झाला. त्यात अन्य गोष्टींसोबत हिंदू धर्म आणि संस्कृतीबद्दलही चर्चा झाली.
धर्मांतरास नकार
सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंना डॉक्टर होण्यास खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कलकत्ता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतात महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे याचे प्रतिपादन केले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा कधीही त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.आनंदीबाईंचे हे भाषण नागरिकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून भारतातून आर्थिक मदत जमा झाली.
जिद्दीने शिक्षण घेत आजारावर मात
१८८३ मध्ये ‘द सिटी ऑफ कॅलकत्ता’ (The City of Calcutta) बोटीतून आनंदीबाई न्यूयॉर्कला पोहोचल्या. आनंदीबाईंनी वैद्यक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळावा म्हणून पेनिसिल्वानियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयाला पत्र लिहिले. महिलांसाठी वैद्यकीय अभ्यासक्रम चालविणारे ते जगातील दुसरेच महाविद्यालय होते. महाविद्यालयाच्या डीन रचेल बॉडली यांनी आनंदीबाईंना प्रवेश दिला, शिवाय आनंदीबाईना शिष्यवृत्तीही मिळाली. अशाप्रकारे वयाच्या १९ व्या वर्षी आनंदीबाईंचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. त्यांना अमेरिकेतील संपूर्ण वास्तव्या दरम्यान कारपेंटर बाईंचा मोठा आधार होता.
आनंदीबाईंची भारतात असतानाच नाजूक झालेली तब्येत अमेरिकेत गेल्यावर तिथली थंड हवा आणि सवयीचा नसलेला आहार यामुळे अजूनच बिघडली. त्यातून पुढे क्षयरोगाचे निदान झाले. असे असतानाही आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदीबाईं ११ मार्च १८८६ रोजी एम.डी. झाल्या. आर्य हिंदू समाजातील प्रसूतिविद्या हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.
कष्ट,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अभ्यासक्रम दोनच वर्षांत पूर्ण करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईनी एमडी पदवी मिळवली. त्यासाठी त्यांनी ‘‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’‘ या विषयावर प्रबंध लिहिला. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. एम.डी. होऊन भारतात आल्यावर त्यांनी कोल्हापूरमधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमधील स्त्री कक्षाची जबाबदारी घेतली.
केवळ २१ वर्षाच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी आदर्श उभा केला.'चूल आणि मूल' म्हणजेच आयुष्य असे समजणाऱ्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी मानदंड घालून दिला.
- अंजली तागडे, पुणे