समरसतेसाठी संघाकडून अपेक्षा - पद्मश्री नामदेव ढसाळ
प्रसिद्ध कवी, दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेव ढसाळ यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांचे जीवन जातीय विषमतेच्या निर्दयी फटक्यांना सहन करत संपूर्ण देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर झळाळते आहे. एक काळ असा होता की त्यांच्या शालेय शिक्षणाचीही पूर्णता झाली नव्हती, तेव्हा त्यांनी टॅक्सी चालवत उपजीविका केली. परंतु, काळाच्या ओघात त्यांची प्रतिभा उजळत गेली आणि ते आज समकालीन साहित्य विश्वातील सर्वाधिक प्रभावी हस्ताक्षरांपैकी एक बनले. साहित्य अकादमीने त्यांना 'स्वर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार' (गोल्डन ज्युबिली लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड) प्रदान केला, तर भारत सरकारने १९९९ मध्ये त्यांच्या साहित्य सेवेबद्दल त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव केला. नोबेल पुरस्कार विजेते श्री वी. एस. नायपॉल यांनी आपल्या 'ए मिलियन म्युटिनीज नाऊ' या पुस्तकात संपूर्ण प्रकरण त्यांना समर्पित केले आहे. मूळतः मराठी कवी असलेल्या श्री ढसाळ यांनी दिनांक ३० ऑगस्ट रोजी हिंदी भवन, दिल्ली येथे 'समरसता' या सूत्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात जे भाषण दिले, त्याचा हा संपूर्ण अनुवाद –
बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिद्धांतांवर चालत मी दलित समाज आणि सवर्ण समाज यांच्यातील दरी मिटवण्याचे व्रत घेतले आहे आणि गेली ४० वर्षे मी वैयक्तिक तसेच संघटनात्मक पातळीवर हे कार्य करत. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य नाही, पण जर संघ सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आपल्या ४०-५० वर्षांच्या अनुभवांनंतर काहीतरी करायला इच्छुक असेल, तर मी संघाला अस्पृश्य मानत नाही. मला माहित आहे की संघाच्या व्यासपीठावर आल्याने पुरोगामी मंडळी मला शिवीगाळ करतील, पण त्याची मला पर्वा नाही, कारण ते लोक काहीच करत नाहीत. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे म्हणजे देश आणि समाजाची एकता. मी ठाम तत्त्ववादी आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे.
जातिव्यवस्थेमुळे माझे बालपण हरवले आहे. मी महाराष्ट्रातील महार समाजाचा आहे आणि मतांतरित बौद्ध आहे. बालपणीच्या अनेक घटना मला आठवतात. सकाळी माझी आई मला भाकर मागण्यासाठी सवर्णांच्या वस्तीमध्ये पाठवत असे. त्या वेळी मी दुसरी-तिसरीत होतो. हातात घुंगरू बांधलेली काठी असे आणि फाटके-तुटके कपडे घालून मी घराघरांतून भाकर मागत असे. सवर्ण वस्तीजवळ येताच तिथले कुत्रे मला घेरत असत. माझा आवाज ऐकून घरातली एखादी बाई चिडून म्हणायची – "सकाळ-सकाळी आलास, मेलास का नाहीस अजून?"
सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश श्री चंद्रचूड आमच्या गावचे वतनदार होते. राजगुरू यांसारखे क्रांतिकारीसुद्धा आमच्या गावचेच होते. चंद्रचूड हे ब्राह्मण जमीनदार कुटुंबातील होते. काहीही असो, पण आमच्या – म्हणजेच अस्पृश्यांच्या जमिनीवर त्यांच्याच कुटुंबाचे शेती व्यवसाय चालत होते.
मी प्रयोगशील आहे. समकालीन साहित्य क्षेत्रात माझ्या रचनांना प्रसिद्धी मिळाली आहे, त्यामुळे मला कोणत्याही टीकेची भीती नाही. मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून खूप अपेक्षा आहेत. संघाने योग्य मार्गावर चालले पाहिजे आणि चालायलाही हवे. माझे मार्क्सवादी मित्र व कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक मला संघाच्या सरसंघचालकांसोबत बसताना पाहून नक्कीच नाराज होतील आणि शिवीगाळ करतील, हे मला ठाऊक आहे. पण मला संघाला खूप काही सांगायचे आहे.
भारतीय धर्म – मग तो वैदिक धर्म असो, हिंदू धर्म असो किंवा दुसरा कोणताही – लहान मुलांमध्ये ईश्वर पाहतो. पण मला माझे बालपण आठवते. आम्ही खूप यातना सहन केल्या आहेत. शाळेत भेदभाव, पिण्याच्या पाण्यात भेदभाव आणि खेळात भेदभाव – हे सगळे मी अनुभवलं आहे. आमचे गाव वेण नदीच्या किनारी आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आमच्यासाठी स्वतंत्र जागा होती. आधी सवर्ण लोकांचे पाणी घेण्याचे ठिकाण, मग त्यांचे स्नानाचे ठिकाण, त्यानंतर त्यांच्या जनावरांचे पाणी पिण्याचे ठिकाण आणि शेवटी आमच्यासाठी पिण्याचे पाणी, जे स्मशानभूमीजवळ होते.
एकदा मी आणि माझे मित्र एका पोहरात पोहायला गेलो. त्या पोहराचे मालक चंद्रचूड कुटुंबीय होते. आम्ही तिथे मजा करत होतो, तेवढ्यात चंद्रचूड कुटुंबातील एक जेष्ठ व्यक्ती घोड्यावरून तिथे आले. माझे मित्र पळून गेले, पण मी आणि माझा भाऊ तिथेच राहिलो. त्यांनी माझ्या वडिलांचे नाव विचारले. मी "लक्ष्मण महार" असे उत्तर दिल्यावर त्यांनी घोड्यावरून उतरून माझ्यावर दगडांचा मारा केला. माझे मित्र त्यांच्या विरोधात गेले, त्यांनी त्या व्यक्तीला रोखले आणि शेवटी आम्ही घरी परतलो.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा दर्जा दिला. बाबासाहेब नसते, तर आम्ही अजूनही जनावरांसारखेच वागवले गेलो असतो. त्यांनी या अन्यायाविरुद्ध बंड पुकारले. "हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही," असे जाहीर करून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि दलितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून दिले.
समरसतेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले पाहिजेत. पण आज काय परिस्थिती आहे? वाल्मीकी ऋषींचा जन्मदिवस फक्त काही विशिष्ट समाजातील लोकच साजरा करतात. स्वातंत्र्यानंतरही जर ८०० जाती आणि ५००० उपजाती अस्तित्वात असतील, तर समाज जोडला जाणार कसा? आम्ही नवीन समाजनिर्मितीची भाषा कशी करू शकतो?
पश्चिमी संस्कृतीबद्दल आपण खूप बोलतो, पण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ते अत्यंत सभ्य आहेत. मी जर्मनीमध्ये एका साहित्य संमेलनाला गेलो होतो. मी अस्पृश्यता आणि जातीभेदांवर भाषण दिले. नंतर लोकांनी विचारले – "तुमच्या संस्कृतीचे नाव काय?" तेव्हा मला बाबासाहेबांची घोषणा आठवली – "हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही!"
बौद्ध, जैन आणि शीख धर्माला हिंदू धर्मापासून वेगळे मानणे हा मोठा गुन्हा आहे. आम्ही हिंदू धर्माच्या सर्वात खालच्या पातळीवरील कर्मकांड भोगले आहेत. तरीही, समरसता साधण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. समाज जोडण्याचा व्यापक प्रयत्न केला पाहिजे.
संदर्भ – समरसता के सूत्र
अनुवाद – आप्पासाहेब पारधे
निश्चितच.... समरसता मंच हा संघाचा एक विभाग असुन या माध्यमातून स्प्रुश्य -अस्पृश्य हा भेदभाव हा एक हिंदू समाज म्हणून समुळ नष्ट करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन अखंड हिंदू राष्ट्र होण्याची ही वेळ योग्य होईल...
गणेश जगन्नाथ कल्याणी
16 Feb 2025 10:43
अतिशय योग्य वेळेला हा लेख मिळाला म्हणजे शेवटी वेळ चांगली आहे कारण सोमवारी माझ्या कडे एक कार्यक्रम आहे आणि मी माझे शालेय मित्र दलित समाजाचे आहेत त्यांना पण निमंत्रित केले आहे आणि त्यात मी माझ्या एका जवळच्या दलित मित्राला बोलावलं आहे त्याला हा लेख मी शेअर करणार आहे आणि ही वेळ खुप मोठा बदल घडवण्याची आणि आपल्या सर्वांनाच एकत्र येण्याची हे त्यांना लक्षात आणून देईन धन्यवाद ????????
प्रकाश मोहनलाल पोळ
16 Feb 2025 08:24
आदरणीय नामदेव ढसाळ यांचे नाव मी ऐकून होतो. त्यांनी बालपणपासून जातीयतेच्या विरुद्ध दिलेला लढा ऐकून अंगावर काटाच येतो. माझे आई आणि वडील हे मला लहानपनापासून अस्पृश्यावर केल्या गेलेल्या अन्यायाबद्दल सांगायचे. तेव्हा वाटायचे हे सारं कशासाठी? यांतून काय साध्य होणार आहे? तेव्हाच मी ठरवलं की आपण यांच्यासाठी काही करायचं? आणि माझे अनेक अस्पृश्य मित्र सोबत घेऊन मी त्यांना संघ शाखेत आणले. तेही आलेत. पण त्यांचे काही लोक त्या मुलांना विरोध करायचे. तरीही ती मुलं नजर चुकवून यायचे. हे सारं मी अनुभवलं आहे.
विजय मोहरीर
16 Feb 2025 08:05
अतिशय योग्य वेळेला हा लेख मिळणा म्हणजे सौभाग्यच वाटतय कारण सोमवारी समरसता लातूर शहर विभागातर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि त्यात मी माझ्या एका दलित मित्राला बोलावलं आहे त्याला हा लेख मी शेअर करत आहे धन्यवाद
अमित भारतराव पांडे
16 Feb 2025 01:08
समरसता अभियान संघाकडुन गेले १५ वर्ष राबविण्यात येत आहे. यात अभिप्रेत पंचशील तत्व अभिप्रेत आहे.
मा. ढसाळ साहेबांसारखे विचारवंत एकत्र आले तर बहुजन समाज एकत्र येण्यास मदतच होईल. समरसता अभियान एक राष्ट्रीय कार्य आहे.
राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवून स्वच्छ मनाने या राष्ट्रीय कार्यास योगदान देवुया.
उदय पयेलकर
15 Feb 2025 20:44