सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे श्री पंचमुखी महादेव मंदिर येथे दिनांक. १९ सप्टेंबर २०२५ रोजी भव्य हिंदू संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात साधुसंत, महंत, प्रवचनकार, कीर्तनकार व शिवाचार्य, भागवताचार्य असे मोठ्या संख्येने संत उपस्थित होते. दीर्घ चिंतनमंथन व परस्पर चर्चा-विचारविनिमय यानंतर संमेलनात "धर्म सुरक्षा कायदा तातडीने झाला पाहिजे" हा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला.
संमेलनाच्या प्रारंभी हिंदू समाजासमोरील विद्यमान आव्हानांचा उहापोह करण्यात आला. गेल्या काही काळात समाजातील काही घटकांची होत असलेली फसवणूक, प्रलोभन देऊन केलेली धर्मांतराची प्रकरणे, तसेच साधुसंतांवर होणारे हल्ले या बाबी संतांच्या चिंतेचा विषय ठरल्या. शासनाने या आव्हानांना गांभीर्याने घेत ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी ठाम भूमिका उपस्थित संतांनी नोंदवली.
सदर संमेलनात संतांनी हिंदू धर्मातील जाती-पातीच्या भिंती दूर करण्यावर भर दिला. जातीय भेदामुळे हिंदू समाजात फूट पडत असून याचा गैरफायदा विधर्मी, विद्रोही व परकीय शक्ती घेत आहेत, असे मत मांडण्यात आले. त्यामुळे समाजात समरसता, एकात्मता आणि बंधुता प्रस्थापित करून धर्मसंरक्षणाची भक्कम पायाभरणी करणे ही काळाची गरज असल्याचे एकमुखाने अधोरेखित झाले.
यावेळी संमेलनात परम पूज्य महंत बालयोगी स्वामी श्री जगन्नाथगिरिजी महाराज, परम पूज्य स्वामी श्री अभयानंदगिरी महाराज, परम पूज्य महंत श्री कृष्णगिरीजी महाराज कायगाव यांच्यासह सिल्लोड तालुक्यातून व जिल्हातून अनेक संत महंत कीर्तनकार आणि प्रवचनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प. पूज्य महंत योगी दत्तनाथजी महाराज गुरु गोरक्षनाथ आखाडा, दक्षिणमुखी मारुती शिंदखेडा यांनी आपली संस्कृती जपण्यासाठी प्राचीन काळापासूनसंतांनी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला संमेलनादरम्यान अनेक जेष्ठ संतांनी "धर्माच्या जागरणात संतांची भूमिका", तसेच सामाजिक समरसता, विद्यमान भेदभाव आणि त्यावरचे उपाय याविषयी सखोल विवेचन केले. त्यांनी धर्मासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या संतांचा बलिदानपर इतिहासही उपस्थितांना स्मरण करून दिला.
संत संमेलनात एकमुखाने खालील ठराव मंजूर करण्यात आले :
१) धर्मांतरबंदी कायदा तातडीने करण्यात यावा. श्रद्धाळू हिंदू बांधवांची फसवणूक, प्रलोभन वा दडपशाही करून होणारी धर्मांतरे थांबवण्यासाठी हा कायदा अत्यावश्यक आहे.
२) मठ व मंदिर ही हिंदू समाजाची श्रद्धास्थाने शासनाच्या ताब्यातून मुक्त करण्यात यावीत. ती पुन्हा एकदा धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी स्वतंत्र व स्वायत्त राहिली पाहिजेत.
३) साधूसंत, धर्मगुरू व कथा कीर्तनकार व प्रवचनकार यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा. धर्मरक्षणासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या या संतांची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे.
४) मठ, मंदिरे व त्यांच्याशी संबंधित जमिनीवरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवली जावीत. या धार्मिक स्थळांचा सन्मान अबाधित ठेवणे आवश्यक आहे.
५) हिंदू धर्माच्या पवित्र श्रद्धास्थानांपैकी भीमा, इंद्रायणी व गोदावरी या नद्यांचे वैज्ञानिक पद्धतीने शुद्धीकरण करून त्या पुन्हा पवित्र व पूज्य बनविण्यात याव्यात.
६) शासकीय परिपत्रकामध्ये भारतीय काल गणनेनुसार तारखे सोबत तिथीचा उल्लेख अनिवार्य करावा तसेच जन्म मृत्यू नोंदणीवर तिथीचा उल्लेख करावा.
सिल्लोड येथील संत संमेलनातील या ठरावांमुळे हिंदू समाजाच्या भावना व अपेक्षा शासनापर्यंत पोहोचतील. या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक व परिणामकारक कार्यवाही करावी, असे आवाहन सर्व उपस्थित संतांनी एकमुखाने केले. या संत संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अन्वी ग्रामस्थ आणि तालुक्यातील समाजातील अनेक सर्जनशक्तीने मदत केली आहे. संमेलनाची सांगता पसायदानाने झाली.
*****