
जामनेर, दि. ३० मे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, देवगिरी प्रांत आयोजित संघ शिक्षा वर्गाचा जाहीर समारोप कार्यक्रम आज सायंकाळी इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुल, भुसावळ रोड, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे प्रतिवर्षी कार्यकर्ता प्रशिक्षण संघ शिक्षा वर्गामध्ये होत असते. यावर्षीचा संघ शिक्षा वर्ग दि. १५ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत जामनेर येथे आयोजित करण्यात आला होता. वर्गाच्या समारोपानिमित्त जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भरतसिंह सुरतसिंह जाधव (श्री गजानन महाराज सेवाश्रम) हे होते. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय समरसता संयोजक श्री. रवींद्र बाळकृष्ण किरकोळे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर भुसावळ जिल्हा सह कार्यवाह चंद्रशेखर पाटील, जळगाव विभाग संघचालक राजेश आबा पाटील तसेच तालुका संघचालक ऍड. प्रमोद काशिनाथ सोनार उपस्थित होते.

श्री. रवींद्र बाळकृष्ण किरकोळे यांनी आपल्या उद्बोधनात म्हणाले की संघ शंभर वर्षापर्यंत सातत्याने सक्रियपणे कार्यरत राहिला त्यामध्ये अशा प्रशिक्षणाची महत्वाची भूमिका आहे. या प्रशिक्षणातून केवळ शारीरिक कसरत होत नाही तर कार्यकर्त्यांमध्ये परस्परांचे मन जुळते. स्वयंशिस्त लागते. त्यामधूनच समरसमय, चारित्र्यवान, राष्ट्रभक्त मनुष्य निर्माणाची प्रक्रिया होते. हेच संघाला अपेक्षित आहे. तसेच संघ आणि राजकारण ह्या दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहेत. संघ पक्षीय राजकारणापासून कोसो दूर आहे हे समजून घेतले पाहिजे. संत रोहिदास यांचा समरस विचार हाच संघाचा विचार आहे. संघाने हिंदूंना हिंदू बनवण्याचे काम केले. आपली ओळख जातीच्या, प्रांताच्या, भाषेच्या आधारावर सांगणाऱ्या समाजाला संघाने ‘हिंदू’ बनवून एकजूट केले असे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी भरतसिंह सुरतसिंह जाधव आपल्या मनोगत सांगताना म्हणाले, “संघ म्हणजे राष्ट्रप्रेम व धर्मनिष्ठेसाठी सतीचे वाण घेतलेली संघटना आहे. मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच जगतो. वारकरी संप्रदायाचा आणि गजानन भक्त परिवाराचा मी पाईक आहे. संघ कामातून निरपेक्ष भावनेने सेवा करण्याचा संदेश मिळतो. गजानन महाराज भक्त परिवारामध्ये सुद्धा आमचा हा संस्कार सेवाकार्यासाठी प्रेरक ठरतो.”
यावेळी संघ शिक्षा वर्गातील विविध उपक्रम, प्रशिक्षण पद्धती, स्वयंसेवकांचे अनुभव तसेच वर्गामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
कार्यक्रमानंतर स्वयंसेवकांनी तयार केलेल्या विविध विषयांवरील प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक केले. पंधरा दिवसांच्या या वर्गात शिक्षार्थी स्वयंसेवकांनी संघटन, व्यवस्थापन, बौद्धिक, शारीरिक व सेवाकार्याचे प्रशिक्षण घेतले. देवगिरी प्रांतातील महाविद्यालयीन व व्यावसायिक १२२ स्वयंसेवकांनी या वर्गात सहभाग घेतला. २३ ते ३० मे दरम्यान सात दिवस घोष वर्ग सुद्धा झाला. त्यामध्ये ७० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. तसेच भोजन व्यवस्थेमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यांनी १५०० पोळ्यांचे संकलन केले तर १५ दिवसात शहरातील २१३५ घरातून २१,३५० पोळ्या संकलित करण्यात आल्या.