
महाड सत्याग्रह हा २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना पिता यावे म्हणून केला होता. यामुळेच २० मार्च हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिन’ म्हणून भारतात साजरा केला जातो. ही आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन केलेली पहिली सामायिक कृती होती. या सत्याग्रहास महाडचा सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्तिसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणूनही ओळखले जाते.
भारतीय जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना उच्च जातीय हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आलेले होते. अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसेच मुख्य रस्त्यावरून चालण्यास परवानगी नव्हती. ऑगस्ट १९२३ मध्ये मुंबई कायदे मंडळाने एक निर्णय पारित केला. त्यानुसार सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही वहिवाटीचा हक्क असेल. महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी १९२४ रोजी ह्या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.
कोकणातील महाड हे शहर सत्याग्रहासाठी निवडले गेले कारण, उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी तयारी दाखवली होती. त्यामध्ये अनंत विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस हे महाड नगरपालिकेचे प्रमुखही त्यात सहभागी होते. यांच्यासह अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहयोगी महाड सत्याग्रह दरम्यान डॉ. आंबेडकरांना मदत करण्याचे काम ते करीत होते. १९२७ साली सुरेंद्रनाथ टिपणीसांनी नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती, सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रण दिले. सभेनंतर सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. आंबेडकर सर्वात प्रथम त्या तळ्यामधून पाणी प्यायले आणि त्यानंतर तिथे जमलेले सर्व लोक त्या तळ्यातील पाणी प्यायले. त्यावेळी स्त्री-पुरुष मिळून सुमारे ५००० जण ह्या सभेसाठी आणि नंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आलेले होते.
डॉ. बाबासाहेबांनी या प्रसंगी जी तात्त्विक भूमिका मांडली, ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे -
"नेपोलियनने ज्या इंग्लंड देशाला 'दे माय धरणी ठाय' असे केले,त्या देशाने मराठेशाहीचे उच्चाटन केले ह्याचे कारण मराठ्यांतील जातिभेदाची तेढ व आपसातील दुही हे नसून ब्रिटिशांनी एतद्देशीयांचे सैन्य उभारले हे होय. पण ते सैन्य असे अस्पृश्य जातीचे. अस्पृश्यांचे बळ जर इंग्रजांच्या पाठीशी नसते, तर हा देश त्यांना केव्हाही काबीज करता आला नसता."
"चवदार तळ्यातील पाणी पशू पीत; पक्षी पीत.
इतकेच काय, पण गोहत्येस धर्म मानणारे मुसलमान नि बायबलाचा ज्याला आधार नाही तो सारा अधर्म अशी शेखी मिरवणारे ख्रिश्चन यांनाही हिंदूंबरोबर चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा समान हक्क असे.
परंतु युगानुयुगे राम, कृष्ण, विठोबा या हिंदूंच्या देवांना आपले देव म्हणून मानणाऱ्या अस्पृश्य हिंदूंना मात्र सारे सार्वजनिक पाणवठे, विहिरी नि तलाव बंद ! त्या दीनदुबळ्या दलितवर्गीयांनी पाणवठ्यावरून पाणी घेतले तर सवर्ण हिंदूंचा,वेदमूर्तीचा नि धर्ममार्तंडाचा धर्म बुडे धर्म ! त्यांची जगात अप्रतिष्ठा होई ! पत घटे ! संस्कृती कलंकित होई ! धर्माला अधमाचे स्वरूप येते ते असे."
"वेदांत जर नीतीचे सिद्धान्त सांगितले नाहीत आणि व्यवहारात जर मातीची व धर्माची आवश्यकता असेल, तर वेदांतील धर्म व्यवहारोपयोगी नाही. असे म्हणण्याऐवजी तो व्यवहारोपयोगी करण्याचे धैर्य ह्या दुबळ्या लोकांत नाही,असे म्हटले पाहिजे. 'धारणाद्धर्म: यतोऽम्युदय नि: श्रेयससिद्धिः स धर्म: ॥' हे मानणारे लोक त्याप्रमाणे आचार नि प्रचार का करीत नाहीत, असे आंबेडकरांनी विचारले. एका हाताने शुद्धी करून हिंदू धर्मात घेणे व दुसऱ्या मार्गाने छळून स्वकीयांना परधर्मात घालविणे म्हणजे श्रद्धानंदप्रणीत शुद्धी नसून ते बेशुद्ध माणसाचे वर्तन आहे. शुद्धिसंघटन चळवळीसंबंधी आमचे असे मत आहे की,हिंदू लोकांना आजच्या काळी शुद्धीपेक्षा संघटनेची विशेष जरूरी आहे."
"हिंदूनी मुसलमान होऊन त्या तळ्यातील पाणी भरले तर हिंदू धर्मास विटाळ होत नाही. परंतु हिंदुधर्मीय महार-चांभारांनी त्यातले पाणी भरले तर हिंदु धर्म बुडतो, अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, है धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे.' त्यांनी भीमगर्जना केली की, 'अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे."
हिंदु संघटनेची आवश्यकता प्रतिपादन करत असता डाॅ. आंबेडकर म्हणतात की.....
"हिंदू समाजाची शक्ती जातिभेदांमुळे व अस्पृश्यतेमुळे क्षय पावली.अस्पृश्यांचा धिक्कार करून आपल्या उज्ज्वल धर्माला काळिमा लावणाऱ्या पापाचरणी धर्मवेड्या लोकांच्या असल्या अधम कृत्यांपासून परावर्तन करणे हे त्यांचे कर्तव्य होते. हिंदू समाजाची भरती अजिबात बंद झाली असून त्याला सारखी आहोटी लागली आहे, हे उघड्या डोळ्यांनी पाहत असता हिंदू धर्मात आहेत त्यांचा छळ करून लोकविग्रह करण्याच्या दुष्ट प्रयत्नास आळा घालून त्यांना न्यायाने व समतेने वागवून लोकसंग्रह करण्याचा धडा या लोकांना अशा वेळी घालून देणे अवश्य होते. त्यास कोणी ना म्हणेल असे वाटत नाही. हिंदुसभेच्या कार्याची संघटना नि शुद्धी अशी दोन कार्ये आहेत. या दोन कार्यांपैकी आमच्या मते संघटना हेच जास्त महत्त्वाचे कार्य आहे. आमचे असे मत आहे की हिंदूनी आपले संघटन केले, तर शुद्धीची काही आवश्यकता उद्भवणार नाही. हिंदूंनी चातुर्वर्ण्य नष्ट करून एकवर्णी समाज करावा."
नंतर १९ मार्च १९४० रोजी डॉ. आंबेडकर यांनी महाडमधे १४ वा महाड सत्याग्रह दिन आयोजित केला. महाड शहरात डॉ. आंबेडकर यांचा मोर्चा व सभा झाली. या दिवशी महाड नगरपालिका प्रेसिडेंट, विष्णु नरहरी खोडके यांनी एक समारंभ आयोजित करून आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले. खोडके यांनी १९३१ पासून डॉ. आंबेडकर यांच्या चळवळींना पाठिंबा दिला होता. ह्या सत्याग्रहासाठी स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असल्याने आंबेडकरांनी स्त्रियांना खास आवाहन केले आणि आपली जात दाखवणारी कोणतीच लक्षणे आपल्या शरीरावर न बाळगण्याविषयी उपस्थित स्त्री-पुरुषांना आवाहन केले. त्यातच पुरुषांनाही हातात कायम काठी ठेवण्यासारखी चिन्हे बाळगण्याची आता गरज नाही. तत्कालिक स्त्रिया गुडघ्यापर्यंतच तोकडे लुगडे नेसत असत. आंबेडकरांनी स्त्रियांना इतर उच्च जातीय स्त्रीयांसारखे पूर्ण टाच घोळ लुगडे नेसण्याचे सुचवले. त्याची अंमलबजावणी लागलीच पुढच्या काही दिवसांतच घडून आली.
संदर्भ - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चरित्रग्रंथ, लेखक - धनंजय कीर