कालकथीत रा. सू. गवई यांच्या पत्नी व सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आदरणीय कमलताई गवई यांचे नाव वापरून एक खोटे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. त्या पत्रात लिहिले होते की, “मी आंबेडकरी आहे. संविधानाप्रती प्रामाणिक राहीन. अमरावती येथील श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात होणाऱ्या विजयादशमी उत्सवात सहभागी होणार नाही. मला विश्वासात न घेता किंवा लेखी संमती न घेता केलेली ही कार्यक्रमाची घोषणा म्हणजे आर. एस. एस. चे षडयंत्र आहे.”
हे पत्र वाचल्यानंतर मला जाणवले की हे कमलताईंचे पत्र नसावे आणि आज त्यांचे सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे स्पष्ट केले की कमलताई स्वतः संघाच्या विजयादशमी उत्सवात सहभागी होणार आहेत. म्हणजेच, काही समाजविघातक वृत्तींनी, विशेषत: कम्युनिस्ट व कोंग्रेसी लोकांनी हेतुपुरस्सर खोटी माहिती पसरवून आंबेडकरी समाजाची दिशाभूल करून संघ व हिंदू समाजाविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आदरणीय कमलताई गवई यांच्या संघाच्या उत्सवाला जाण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो कारण एखाद्या नव बौद्ध व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नुसते नाव जरी घेतले तरी त्याला खूप काही ऐकावे लागते अशी विषारी वैचारिक पेरणी समाजद्रोही यंत्रणांनी करून ठेवलेली आहे.
खरेतर, आंबेडकरी समाज हा बाबासाहेबांविषयी अत्यंत भावनिक आहे. त्यांच्या भावनेचा गैरवापर करून काही मंडळी खोट्या अफवा पसरवतात, जेणेकरून बौद्ध समाज व हिंदू समाजामध्ये अंतर वाढेल. पण हे लक्षात ठेवायला हवे की, परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास बौद्ध धम्म दिला आहे, आणि बौद्ध धम्माचा मूलमंत्र आहे – मैत्री, करुणा, प्रज्ञा आणि द्वेषाचा त्याग. मग इतक्या द्वेषाला वाव देण्याचे कारणच नाही.
आजची सर्वात मोठी गरज म्हणजे – बौद्ध व हिंदू समाजामध्ये बंधुत्व, मैत्री व परस्पर आदर निर्माण होणे. कारण दोन्ही समाज राष्ट्रभक्त शक्ती आहेत, आणि भारत राष्ट्र अधिक सक्षम होण्यासाठी यांचा परस्पर संवाद व सहकार्य आवश्यक आहे.
कमलताई यांचे समाजमाध्यमात प्रसारित झालेले हे खोटे पत्र वाचून त्यामागील षडयंत्र आपण लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे.
आपण जर बाबासाहेबांचा कार्याचा आणि संघाचा बारकाईने अभ्यास केला तर त्यात मूलभूत साम्य निदर्शनास येते.
• बाबासाहेब प्रखर राष्ट्रभक्त होते.
• संघ राष्ट्रभक्त नागरिक घडवतो.
• बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील विषमता व कुप्रथांविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला.
• संघाचे सामाजिक समरसता मंच “समता आणू समरसतेतून” हे ब्रीद घेऊन सामाजिक समतेसाठी काम करते.
• बाबासाहेबांनी बंधुतेचा पुरस्कार केला.
• संघ देखील बंधुत्वावरच उभा आहे.
विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः कराड येथे संघाच्या शाखेत गेले होते. तिथे त्यांच्या भाषणात त्यांनी स्पष्ट म्हटले होते की –
“काही बाबतीत वैचारिक मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणाने पाहतो.” याचे पुरावे देखील उपलब्ध आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायधीशांचे कालकथीत वडील व माजी राज्यपाल श्री रा.सु. गवई हे संघाच्या नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. विद्रोही कवी नामदेव ढसाळ, साहित्यिक गंगाधर पानतावणे, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंडीत रेवाराम कवाडे, माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम अशा अनेक महानुभाव संघाच्या कार्यक्रमांना आले आणि त्यांनी आपलेपणाने संवाद साधलेला आहे.
मग प्रश्न असा आहे की, आदरणीय कमलताई या संघाच्या विजयादशमी उत्सवाला जात असतील तर अशा प्रकारे खोटे पत्र प्रसारित करण्याची काय गरज आहे? त्यापत्राच्या माध्यमातून संघाविषयी एवढा द्वेष पसरवण्याचे काय कारण?
कमलताई या स्वयंभू आहेत त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्यांनी संघ उत्सवाला जाण्याचा निर्णय विचारपूर्वकच घेतला असणार आहे. त्यांना संघ उत्सवात जाऊन आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या व्यक्तिगत निर्णयावर अशा खोट्या पत्राद्वारे बौद्ध समाजाचा दबाव आणण्याचे हे कारस्थान आहे. आंबेडकरी व्यक्तीने संघ किंवा हिंदू समाजाशी संबंधच ठेऊ नये व त्यांच्या उत्सवात जाऊच नये हे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे नाही का?
या माध्यमातून समाज विघातक वृत्तींना बौद्ध समाजात संघाबद्दलचा द्वेष वाढवायचा आहे हे स्पष्ट होते. बौद्ध समाजाने संघाचा द्वेष करणे मुळीच योग्य नाही. कारण त्यावेळी बाबासाहेबांचे संघासोबत जे काही मतभेद होते त्यात संघाने बदल केला आहे का? या अनुषंगाने चर्चा करून संघाशी मैत्री करायला काय हरकत आहे? माणसात एकमेकात मतभेद असणे स्वाभाविक आहे परंतु मतभेद असले तरी एकमेकांबद्दल आपलेपणा टिकवता येतो आणि यातूनच बंधुता निर्माण होते.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी बंधुता प्रस्थापित करण्यासाठी संघाच्या उत्सवात गेल्याने काहीच बिघडणार नाही.
त्यामुळे संवाद व चर्चा करायला आणि परस्पर सहकार्य करायला काहीच हरकत नाही.
आज अशा खोट्या पत्रासारख्या घटना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जागरूक राहिले पाहिजे. आंबेडकरी समाजाने संघाशी शत्रुत्व नव्हे तर बंधुत्व निर्माण करायला हवे.
कारण –
॰ बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली समता व बंधुता केवळ संवादातून साध्य होईल.
॰ संघाच्या उत्सवात सहभागी होणे म्हणजे संविधान विरोधी होणे नव्हे. उलट संविधानाचा अपमान तर ते करतात जे अशी खोटी अफवा पसरवतात.
आदरणीय कमलताई गवई संघ उत्सवात जाणार नसल्याचे खोटे पत्र प्रसारित करणारी यंत्रणा ही लोकशाही विरोधी यंत्रणा आहे. त्यांच्या भावनिक षड्यंत्रांना आंबेडकरी समुदायाने बळी पडू नये कारण ही लोकशाही विरोधी यंत्रणा देश उध्वस्त करण्याचे स्वप्न बाळगून आहे. कारण त्यांना माहीत आहे की हिंदू आणि बौद्ध हे प्रखर राष्ट्रभक्त समाज आहेत आणि हे जर एकत्र आले तर त्यांचे देश उध्वस्त करण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
आंबेडकरी समुदाय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात विश्वास व आपुलकी निर्माण झाली तर आपल्या भारत देशाला कोणीही कमकुवत करू शकणार नाही. बंधुता, मैत्री आणि करुणा हाच आपला मार्ग आहे आणि त्यासाठी संवाद महत्वाचा आहे.
नमो बुद्धाय! जय भीम! जय संविधान!