मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याचा उल्लेख करताना स्टेट काँग्रेस, आर्य समाज, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या संघटनांचे मोलाचे योगदान आठवते. जरी मराठवाडा मुक्तिसंग्रामाने अंतिम रूप १९३८ ते १९४८ या दशकात घेतले, तरी निजामांविरुद्ध चाललेला संघर्ष सुमारे १३० वर्षांपासून सुरू होता. इंग्रज आणि निजामाच्या अन्यायाविरुद्ध हिंदू समाजाच्या अनेक पिढ्यांनी सातत्याने लढा दिला, तरुणांनी आपले प्राणही अर्पण केले. इतिहासाच्या पानांत फक्त काही संघर्षच स्थान मिळाले असले, तरी हा आंदोलन नेहमीच स्वातंत्र्याच्या, स्वाभिमानाच्या आणि स्वत्वाच्या आग्रहाने झळकलेला आहे.
मराठ्यांचा प्रभाव:
दक्षिणेत आसफिया घराण्याने सात निजामांच्या माध्यमातून २२४ वर्षे हैदराबाद संस्थानावर राज्य केले. पहिल्या निजामाचे नाव होते मीर कमरुद्दिन. दिल्लीतील अनागोंदी लक्षात घेऊन त्याने दगाबाजी करून स्वतःच्या राज्याला स्वतंत्र राज्य घोषित करून टाकले. या दरम्यान मुघल सत्तेला दक्षिणेत प्रामुख्याने आव्हान देत होते ते मराठे. पेशवा बाजीराव मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असताना त्यांनी व नंतरच्या पेशव्यांनी सुद्धा निजामाला अनेकदा अनेक लढायात पराभूत केले.
यामध्ये १७२७ ची जालना येथील लढाई, पालखेडची लढाई, शेवगावचा तह, १७३७ मध्ये भोपाळ, भालकी, १७५८ मध्ये सिंदखेड लढाई, १७७० मध्ये उदगीर व तांदुळजा, १७६३ मध्ये राक्षस भुवन व १७९५ मध्ये बीड जिल्ह्यातील खर्ड्याची लढाई प्रसिद्ध आहेत. या सर्व लढायांमध्ये मराठ्यांनी निजामाचा पराभव करून त्यावर जरब ठेवलेली आहे. त्यामुळे निजामाला सर्वात जास्त भीती वाटत होती ती मराठ्यांचीच.
आपण जर लवकर काही पावलं उचलली नाहीत तर मराठे आपली सत्ता काढून घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशी धास्ती निजामाला होती. त्यामुळे त्याने आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी इंग्रजांची मदत घेतली आणि इंग्रजांशी इ. स. १८०० मध्ये ‘फेथफुल अलाय’ (निष्ठावान सहकारी), म्हणजेच तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यानुसार निजामाच्या राज्याची सुरक्षा इंग्रजांची जबाबदारी झाली आणि निजाम इंग्रजांचा अंकित झाला.
१८१८ मध्ये दुर्दैवाने मराठेशाहीचा अंत झाल्यामुळे स्वराज्य निर्मितीचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी समाजानेच पुढाकार घेतला आणि अठरापगड जाती, जनजाती, रामोशी, भिल्ल, बंजारा, हटकर, देशमुख, देशपांडे अश्या अनेक गटांनी परकीय सत्तेवर हल्लाबोल केला. त्यांच्यात संघटित सामर्थ्य कमी असेल तरी प्रतिकाराचा तेजस्वी स्फुल्लिंग त्यांच्यात नक्कीच होता. निजाम विरुद्ध झालेले सर्व बंड इंग्रजी फौजेने मोडून काढले. इंग्रज नसते तर निजामी राज्य कधीच नष्ट होऊन गेले असते.
बीडच्या धर्माजी प्रतापराव यांचे बंड:
बीडचे धर्माजी प्रतापराव निजामांविरुद्ध १८१८ मध्ये बंड पुकारले. या बंडावर नियंत्रण ठेवण्यासाठी लेफ्टनंट सदर लँड यांना कामगिरी सोपवण्यात आली होती. त्याला वार्ता मिळाली होती की धर्माजी बीडपासून सुमारे ४५ मैल दूर असलेल्या ‘दिवी’ या गावी आहेत. ताबडतोब त्याने सैन्य पाठवून गावाला वेढा घातला. हल्ल्यासाठी सैन्य दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले. धर्माजी आणि त्यांचे सहकारी गढीत लढत होते. शिड्यांच्या मदतीने एका इंग्रजी तुकडीने गढीत प्रवेश केला. गढीवर झालेल्या हल्ल्यानंतर धर्माजींच्या गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. मोठ्या निकराची लढाई झाली, पण शेवटी धर्माजी आणि त्यांचे बंधू शस्त्र टाकून शरणागती पत्करावी लागली.
नौसाजी नाईक यांचे बंड:
हटकर जमातीच्या लोकांनी तब्बल वीस वर्षापासून निजामाविरुद्ध बंड उभारले होते. त्यांचे मुख्य केंद्र हदगाव तालुक्यातील ‘नोव्हा’ या गावी होते. काँटिजेंट सैन्याने ८ जानेवारी १८१९ रोजी नोव्हा किल्ल्याला वेढा घातला. नौसाजी व त्यांचे बंधू हंसाजी यांनी मुत्सद्दीने इंग्रजांना तोंड दिले. ३१ जानेवारी १८१९ रोजी संघर्षाला प्रारंभ झाला. इंग्रजांनी सुरुंग लावून किल्ल्याच्या भिंतीला पाडले. या नंतर इंग्रज आणि नौसाजी यांच्या सैन्यात मोठी लढाई झाली. नौसाजीच्या ४३९ सैनिकांनी बलिदान दिले. इंग्रजांचेही मोठे नुकसान झाले. नौसाजी इंग्रजांच्या तावडीतून निसटण्यात यशस्वी ठरले. परंतु त्यांना पुन्हा अटक करण्यात आली व आजारपणामुळे तुरुंगातच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला.
उदगीर मधील शिवलिंगच्या देशमुखांचे बंड:
शिवलिंगच्या देशमुखांनी उदगीर किल्ल्यावर आपला हक्क सांगून निजामाविरुद्ध बंड पुकारले. त्यांचे बंड मोडून काढण्यासाठी लेफ्टनंट सदरलँड याची नेमणूक झाली. २४ डिसेंबर १८२० रोजी त्याने देशमुखांच्या टेहळणी पथकावर हल्ला केला व उदगीरवर चाल केली. देशमुखांनी गोळीबार करून त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले. संघर्ष सुरू झाल्यानंतर रात्रीच्या अंधाराच्या फायदा घेत देशमुख निसटले व नंतर माघार घेतली.
अजिंठा भिल्लांचा संघर्ष:
१८१८ मध्ये मराठेशाहीच्या पाडावानंतर कन्नड व वैजापूर हे तालुके औरंगाबादला म्हणजेच निजामी राज्याला जोडले गेले. त्यामुळे कन्नड, वैजापूर, अजिंठा, भोकरदन व सिल्लोड या भागातील भिल्ल जमातीने त्यास विरोध करून बंड पुकारले. या भागात भिल्ल जमातीकडून वारंवार उठाव होऊ लागले. त्यामुळे औरंगाबाद काँटीजेन्टने भिल्लांच्या विरोधात मोहीम उघडली. १८१९ मध्ये गौताळा येथे भिल्लांच्या विरोधात लष्करी कारवाई झाली भिल्लांच्या ३२ प्रमुख नेत्यांपैकी ‘चील नाईक’ हा मुख्य होता. भिल्लांवर दहशत बसावी म्हणून इंग्रजांनी चील नाईक यास पकडुन फाशीची शिक्षा केली. तरीही भिल्ल डगमगले नाहीत. त्यांनी ‘जंधुला’ व ‘जकिरा’ यांच्या नेतृत्वात लढा सुरूच ठेवला. अजिंठा भागात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. इंग्रजांनी अजिंठा डोंगराला वेढा घालून जांधुला व जकीरा सह त्यांच्या १२०० साथीदारांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. पण भिल्लांनी पूर्णपणे शस्त्र ठेवलेच नव्हते. १८२२ ते १८४३ अश्या मोठ्या कालखंडात भिल्ल जमाती निजाम राज्यास आणि इंग्रजांशी प्रतिकार करतच होती. त्यांच्या विशेष पराक्रमामुळे त्यांना ‘अजिंठा भिल्ल’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
परभणी जिल्ह्यातील बंड:
इ. स. १८३० मध्ये परभणी जिल्ह्यातील राजाराम याने उठाव केला. हिंगोलीहून त्याच्याविरुद्ध फौज पाठवण्यात आली व २२ सप्टेंबर रोजी त्याचे बंड मोडून काढण्यात आले. १८५२ मध्ये नंदापुर येथील कृष्णाजी देशमुख यांनीही उठाव केला. हिंगोलीच्या सैनिकी तुकडीने त्यांना पकडले. कॅप्टन डॅनियल याने परभणीचे बंड मोडून काढले होते.
नांदेड जिल्ह्यातील उठाव:
कंधारचे राजे हणमंत सिंग यांनी निजामाविरुद्ध बंड केले. काँटीजेन्टच्या सैन्याच्या तुकड्या कंधारला येऊन पोहचल्या. इंग्रजांनी दिलेली चेतावणी हणमंत सिंह यांनी उधळून लावली व संघर्ष सुरू झाला. इंग्रज सैन्याने त्यानंतर किल्ल्यावर तोफगोळे डागून किल्ला ताब्यात घेतला व त्यानंतर हणमंत सिंग यांना माघार घ्यावी लागली.
१८३२ मध्ये लातूरच्या देशमुख आणि शिरढोण येथील देशपांडे यांनी उठाव केला. अंबाजोगाई येथील इंग्रजी सैन्याने त्यांचा उठाव मोडीत काढला.
१८५७ पूर्वी मराठवड्यात विविध ठिकाणी निजाम व इंग्रजी शासनाच्या विरुद्ध उठाव होत राहिले. या उठावांमुळे १८५७ च्या लढ्यात तेजस्वी स्वरूप प्राप्त झाले. देशभरात परकीय राज्यकर्त्यांच्या विरोधात स्वकियांनी ज्याप्रकारे संघर्ष केला, त्याच स्वरूपाचा संघर्ष तत्कालीन हैदराबाद संस्थानात सुद्धा होत होता. मराठेशाहीचे पतन झाल्यानंतर पुढील लढ्याची जबाबदारी समाजाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि जागोजागी उठाव केले. त्यामध्ये त्यांना भलेही यश आले नसले तरी ‘स्व’त्व आणि भारतीय म्हणून असलेली नैतिक कर्तव्य समाज निभावत होता. या लढायांचा परिणाम म्हणूनच की काय, पण शेवटच्या निजामाने अधिक कडवे धर्मांध धोरण स्वीकारले व स्थानिक हिंदू समाजाला चिरडण्याचा उद्योग सुरू केला. परंतु त्यामुळे हिंदू समाजातील गुलामीची आग अधिक भडकत गेली व त्याचा परिणाम म्हणून ह्या लढाईचे रूपांतर राजकीय लढाईत झाले आणि विविध पक्ष संघटना १९३५ नंतर लढ्यात उतरल्या. एका असंघटित लढ्याला संघटित लढ्याचे स्वरूप प्राप्त झाले. यावरून हैदराबाद किंवा मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा हा जवळजवळ १३० वर्षापासून सुरू होता व त्याला पूर्ण यश १७ सप्टेंबर १८४८ मध्ये भारत सरकारच्या ‘अँक्शन पोलो’ मुळे प्राप्त झाले.
वर्ष |
घटना / उठाव |
प्रमुख नेते / तपशील |
१७२७ |
जालना लढाई |
मराठ्यांनी निजामाचा पराभव केला |
१७३७ |
भोपाळ, भालकी लढाई |
मराठ्यांची विजयदृष्टी |
१७५८ |
सिंदखेड लढाई |
मराठ्यांनी निजामावर दबदबा ठेवला |
१७६३ |
राक्षस भुवन लढाई |
मराठ्यांचा पराक्रम |
१७७० |
उदगीर व तांदुळजा लढाई |
मराठा प्रभाव |
१७९५ |
बीड जिल्ह्यातील खर्डा लढाई |
मराठ्यांचा विजय |
१८०० |
‘निष्ठावान सहकारी’ करार |
निजाम इंग्रजांचा अंकित, संरक्षणासाठी ब्रिटिश फौजा |
१८१८ |
मराठेशाहीचा अंत; अठरापगड, रामोशी, भिल्ल, बंजारा, हटकर, देशमुख, देशपांडे गटांनी उठाव |
समाजाने स्वतःच्या खांद्यावर संघर्ष घेतला |
१८१८ |
धर्माजी प्रतापराव – बीड बंड |
लेफ्टनंट सदरलँड यांनी दाबले |
१८१८–१८२२ |
अजिंठा भिल्लांचा संघर्ष |
चील नाईक फाशी; जंधुला व जकीरा नेतृत्व |
१८१९ |
नौसाजी नाईक – नोव्हा किल्ला बंड |
४३९ सैनिक बलिदान; इंग्रजांशी लढाई |
१८२० |
शिवलिंग देशमुख – उदगीर किल्ला बंड |
लेफ्टनंट सदरलँड हस्तक्षेप |
१८३० |
परभणी जिल्ह्यातील राजाराम उठाव |
इंग्रजांनी दाबले |
१८३२ |
लातूर देशमुख व शिरढोण देशपांडे उठाव |
इंग्रजांनी मोडले |
१८५२ |
नंदापुर – कृष्णाजी देशमुख उठाव |
इंग्रजांनी दाबले |
१८५७ |
विविध ठिकाणी उठाव |
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान |
१९३५–१९३८ |
संघटित राजकीय संघटनांचा सहभाग |
स्टेट काँग्रेस, आर्य समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ |
१९३८–१९४८ |
अंतिम स्वरूपात मराठवाडा मुक्ती संग्राम |
जुलूस, आंदोलन, समाजाचे संघटन |
१७ सप्टेंबर १९४८ |
पूर्ण मुक्ती; भारतात विलीन |
‘अँक्शन पोलो’ अंतर्गत पूर्ण यश |
साभार - वायुवेग