
छत्रपती संभाजीनगर १५.०८.२०२६
८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्व. दत्ताजी भाले स्मृती समितीच्या समर्पण कार्यालय येथे आज ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अनिल भालेराव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. अनेक राष्ट्रभक्तांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा संपूर्ण भारतभर स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी दोनवेळा तुरुंगवास भोगला. संभाजीनगरचे स्व. दत्ताजी भाले यांनी हैदराबाद मुक्तीलढ्यात सहभाग घेतला. त्यांना सुद्धा निजाम सरकारकडून तुरुंगवास झाला होता. आता आपण स्वतंत्र भारतात आहोत. आपल्या देशाची उन्नती करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. ‘राष्ट्र प्रथम’ हाच विचार आपल्या देशाला परम वैभम प्राप्त करून देईल असे ते म्हणाले.

तसेच “स्वातंत्र्यामुळे आपल्याला अधिकार मिळाले. मला देशाने काय दिलं पाहिजे याचा विचार आपण करतो. स्वतःचा विचार करतो. परंतु आपण देशाला काय देतो याचाही विचार केला पाहिजे. अधिकारासोबत आपल्याला जबाबदारी सुद्धा मिळाली आहे. त्याची जाणीव ठेवून आपण सुज्ञ नागरिक झालो पाहिजे.” असे बालाजी पाटील यांनी नागरिक कर्तव्य पालन करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देवानंद कोटगिरे यांनी आभार व्यक्त केल्यानंतर वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

प्रांत संघचालक अनिल भालेराव, प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक बालाजी पाटील, दत्ताजी भाले स्मृती समितीचे अध्यक्ष देवानंद कोटगिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सामूहिक गीतगायन केले. अनिल जोशी यांनी वैयक्तिक गीत गायले. यावेळी अनेक नागरिक, महिला व स्वयंसेवक उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सातारा गावातून तरुणांनी बाईक रॅली काढली होती. तसेच आजूबाजूच्या भटके विमुक्त समाजाच्या बांधवांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
