स्वातंत्र्याची ७९ वर्ष पूर्ण झाली आहेत. एखादी गोष्टी फुकट मिळाली की तिची किंमत कवडीमोल ठरते असे म्हणतात. स्वातंत्र्याचेही तसेच तर झाले नाही ना? हे सतत पडताळून पाहत राहायला हवे. या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी सर्वोच्च बलिदान केले आहे. ह्या आंदोलनाला लहान-मोठा, उच्च-नीच असा भेदभाव माहीत नव्हता. ते सर्वव्यापी देशव्यापी आंदोलन होते.
‘तुम्ही किती जगलात याला महत्त्व नाही, तर कसे जगलात यालाच महत्त्व आहे,’ ही उक्ती राष्ट्रभक्त क्रांतिकारक राजगुरू यांना लागू पडते. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी हुतात्मा राजगुरू. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक क्रांतिकारकांनी आपलं सर्वस्व या मातीमध्ये अर्पण केलं, त्यातीलच एक विशेष नाव म्हणजे हुतात्मा राजगुरू होय.
हुतात्मा राजगुरू यांचा हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीशी असलेला संबंध सर्वांना परिचित आहे. परंतु, हुतात्मा राजगुरू प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी देखील संबंधित होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही शाखा त्यांनी स्वतः स्थापन केल्या होत्या हे फारसे प्रकाशित नाही. २४ ऑगस्ट रोजी हुतात्मा राजगुरू यांची जयंती आहे. त्यानिमित्त या हुतात्मा क्रांतिकारकाच्या प्रेरणादायी जीवनातील काही अपरिचित घटनांचा येथे आढावा घेण्यात येत आहे.
राजगुरू यांचे काशीला जाणे व हसन निजामीच्या हत्येचा प्रयत्न
घरी असताना अभ्यासात लक्ष न घालणारे राजगुरू स्वतःच्या इच्छेने वाराणसीला गेले व तेथे सांगवेद वेदपाठशाळेमध्ये प्रवेश घेतला. बाबाराव सावरकर 'अर्धशिशी'वर औषध घेण्यासाठी अधूनमधून काशीला येत. तेव्हा भूमिगत राहून कार्य करत असलेल्या चंद्रशेखर आझाद यांना ते गुप्तपणे भेटत. अशाच भेटीगाठींच्या दरम्यान राजगुरू बाबारावांच्या संपर्कात आले.
बाबाराव सावरकर यांनी राजगुरू यांना तरुणांना बलोपासनेची दीक्षा देण्यास सांगितले. त्यासाठी राजगुरू स्वतः उत्तम व्यायाम विद्या शिकलेले हवेत. म्हणून, बाबारावांनी राजगुरूंना अमरावती येथे 'हनुमान व्यायामप्रसारक मंडळ'मध्ये जाण्यास सांगितले. बाबारावांनीच राजगुरूंचे तेथील शुल्क भरले. राजगुरू तेथे व्यायाम विशारद झाले. आजही या व्यायामशाळेत राजगुरूंच्या हस्ताक्षरातील नोंद आहे.
अमरावतीला असतानाच एका उन्हाळ्यात राजगुरू यांना प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार भेटले. प. पू. डॉ. हेडगेवार यांनी राजगुरूंना आपण गावोगावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरु करत असल्याचे सांगितले व त्यासाठी राजगुरूंचे सहाय्य मागितले. राजगुरू यांनी त्यास रुकार दिला व अमरावती, वर्धा, नागपूर येथे शाखा सुरु केल्या.
स्वामी श्रद्धानंद यांची हत्या झाल्यावर बाबाराव सावरकर यांनी राजगुरू यांना उत्तर भारतामध्ये सक्तीने बाटवाबाटवी करणाऱ्या हसन निजामी याचा वध करण्यास सांगितले. राजगुरूंनी ते दायित्व स्वीकारले. तेव्हा, बाबारावांनी शिव वर्मा या क्रांतिकारक मार्फत राजगुरूंना पिस्तूल मिळवून दिले. राजगुरू यांनी दिल्ली येथे हसन निजामी जेथे रोज उपस्थित राहतो, तेथे रेकी केली. त्यासाठी ते नमाज कसे पढतात, हे शिकले. ३० जानेवारी रोजी हसनचा वाढदिवस होता. तेव्हा राजगुरूंनी हसन निजामी समजून त्याचा सासरा भाई सोमालिया यास ठार केले. परंतु याचा योग्य तो परिणाम झाला. हसनला यातून योग्य तो संदेश मिळाला व हसन निजामीचे उद्योग बंद झाले.
(संदर्भ - युट्युब व्हिडीओ - क्रांती तीर्थ यात्रा - भाग ०३ - शिवराम हरी राजगुरू - डॉ. श्री. सच्चिदानंद शेवडे) स्त्रोत:- https://www.youtube.com/watch?v=h22iMuHfeZg )
डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि राजगुरू
स्रोत:- https://panchjanya.com/2025/03/23/325989/bharat/azadi-ka-amrit-mahotsav/rajguru-was-an-rss-volunteer-dr-hedgewar-saved-him-from-the-british-police/
ना. ह. पालकर लिखित डॉ. हेडगेवार, पृ. क्र. २२२
“प. पू. डॉक्टर हेडगेवार १९२८ च्या कलकत्ता काँग्रेसच्या अधिवेशनाहून परत आल्यावर थोड्या दिवसांनी लाहोरच्या सॉंडर्स या इंग्रज अधिकाऱ्याला कंठस्नान घातलेले श्री. राजगुरू भूमिगत स्थितीत नागपुरास आले. त्यांची व डॉक्टरांची बरीच ओळख होती. एक-दोन वर्षांपूर्वी राजगुरू हे नागपूरच्या भोसला वेदशाळेत राहून वेदाध्ययन व भिक्षुकी करीत असता मोहिते वाड्यातील संघशाखेवर येत असत व त्यामुळे त्यांचा व डॉक्टरांचा चांगलाच परिचय होता. एवढेच नव्हे, तर श्री. भाऊजी कावरे विद्यमान असताना एकदा सरदार भगतसिंह हे त्यांना व प. पू. डॉक्टरांना भेटून गेल्याचे श्री. नारायणराव देशपांडे (आर्वी) व श्री. व्यंकट नारायण सुखदेव (नागपूर) अशा काही जणांना निश्चित आठवते. ही त्यावेळी डॉक्टरांशी झालेली भेट वर्ध्याचे श्री. गंगाप्रसाद पांडे यांच्या ओळखीने घडली होती.”
“श्री. राजगुरू नागपूरला येण्यापूर्वी कलकत्ता काँग्रेसच्या वेळी श्री. बाबाराव सावरकर व डॉक्टर यांना तेथे भेटले असण्याचीही शक्यता वाटते. १९२९ च्या प्रारंभी राजगुरू नागपूरला आल्यावर त्यांची व्यवस्था करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला होता, त्यात प. पू. डॉक्टरही होते. एवढेच नव्हे तर, भूमिगत असताना राजगुरूंनी पुणे भागात जाऊ नये, असा आग्रह डॉक्टरांनी केला व त्यांची उमरेडचे श्री. दाणी यांच्या दूरच्या एका शेतावर राहण्याची व्यवस्था करण्याचे योजले. पण, अशी योजना चालू असताना राजगुरूंनी डॉक्टरांचा आग्रह डावलून नागपूर सोडले व पुढे ते पुण्याला गेल्यावर थोड्याच दिवसांत पकडले गेले.”
ना. ह. पालकर लिखित डॉ. हेडगेवार, पृ. क्र. २७०
“डॉक्टर हेडगेवार यांचा भगतसिंह व राजगुरू यांच्याशी परिचय होता; इतकेच नव्हे, तर नागपुरातील वास्तव्यामुळे राजगुरूंशी त्यांचे निकटचे संबंध आले होते. असे तेजस्वी तरुण फासावर चढण्यापूर्वी ज्या दुर्दमणीय विश्वासाने व उसळत्या तारुण्याने रसरसून "मेरा रंग दे बसंती चोला। इसी रंग में रंग के शिवा ने माँ का बंधन खोला।", असे गीत मुक्तकंठाने घुमवीत होते. त्याच मनःस्थितीत व त्याच रंगात रंगलेल्या डॉक्टरांनी मातृभूमीच्या विमोचनासाठी अशा जागृत तरुणांची देशव्यापी फळी उभी करण्यासाठी अधिक धडपड करण्याचा निश्चय करून तो आघात सहन केला होता.”
नरेंद्र सेहगल यांचे पुस्तक 'भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता' या हिंदी पुस्तकाधील एका उताऱ्याचा भावानुवाद, पृ. क्र. १४६ -१४७
“लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी सरदार भगतसिंह आणि राजगुरू यांनी लाठीमार करणारा पोलीस अधिकारी सॉंडर्सवर लाहोरमधील मालरोड येथे दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केले. दोन्ही क्रांतिकारक फरार होऊन लाहोरमधून बाहेर निसटले. राजगुरू नागपुरात येऊन डॉ. हेडगेवार यांना भेटले. राजगुरू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोहितेवाडा शाखेचे स्वयंसेवक होते. नागपूरचे एक हायस्कूल असलेल्या भोसले वेधशाळेचे विद्यार्थी असल्यामुळे राजगुरूंची डॉ. हेडगेवार यांच्याशी घनिष्ठ ओळख होती. म्हणून, डॉक्टरांनी आपले एक सहकारी कार्यकर्ते भैयाजी दाणी यांच्या फार्महाऊसमध्ये राजगुरू यांच्या भोजन व निवासाची व्यवस्था केली. राजगुरूंना सांगण्यात आले की, त्यांनी आपल्या गावी पुणे येथे कदापि जाऊ नये; कारण त्यांना तेथे गेल्यास अटक होण्याचा अत्यंत धोका आहे.”
“या इशाऱ्याकडे राजगुरूंनी दुर्लक्ष केले व पुण्याला आपल्या घरी गेले. डॉक्टरांची शंका खरी ठरली. राजगुरूंना अटक झाली, त्यांच्यावर अभियोग चालला. सरदार भगतसिंह व सुखदेव यांच्यासह त्यांना मृत्युदंडाची शिक्षा झाली, तिघांनाही फाशी देण्यात आले. या हौतात्म्यामुळे डॉक्टरांना दुःख झाले परंतु याचे आश्चर्य वाटले नाही. आपल्या सहकाऱ्यांना ते एवढे मात्र नक्कीच म्हटले की, हे बलिदान वाया जाणार नाही.”
२३ मार्च १९३१ रोजी तीन शूर क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली, तर त्यांच्या मृतदेहांवर सतलज नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवराम हरी राजगुरू हुतात्मा झाले तेव्हा ते केवळ २३ वर्षांचे होते; तथापि, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेल्या पराक्रमासाठी आणि त्यांच्या जीवनाच्या समर्पणासाठी ते भारतीय इतिहासाच्या पानांमध्ये नेहमीच स्मरणात राहतील.