छत्रपती संभाजीनगर – २५.०९.२०२५
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई (माधव) विनायक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन आज एम. आय. टी. कॉलेजमधील ‘मंथन सभागृहात’ करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी मधुभाईंसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले मधुभाई आणि मी सोबत अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून काम केले. त्याचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय होता. संघवृक्षाचे परिपक्व फळ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी कार्यकर्त्यांना निरंतर प्रेरणा दिली. केवळ उपदेश केला नाही तर स्वतःच्या व्यवहारातून त्यांनी कार्यकर्ता घडवला. त्यांचे जीवन म्हणजे अंधारातील सतत तेवत राहणाऱ्या नंदादीप सारखे होते असे भावना त्यांनी व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
या श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुलजी लिमये, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, रामलालजी (अखिल भारतीय संपर्क प्रमुख), सुरेशजी जाधव (पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक), सुमंत आमशेकर, उपेंद्रभाऊ कुलकर्णी, सुहासजी भगत, हरिशजी कुलकर्णी, निलेशजी गद्रे, अनंतजी (तात्या) देशपांडे, विनायकजी कानडे, श्रीरंग (दादा) लाड, बाळासाहेब चौधरी, पराग जी कंगले, अनिलजी भालेराव (देवगिरी प्रांत संघचालक), मधुभाईंचे पुतणे विनयजी कुलकर्णी, श्री अतुलजी सावे, श्री संजय केणेकर, विजयाताई रहाटकर, संघाचे अनेक स्वयंसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सभेचे प्रास्ताविक संतोषजी पाठक यांनी केले. त्यांनी मधुभाईंचा विस्तृत जीवन परिचय करून दिला. तर डॉ. यतींद्र अष्टपुत्रे यांनी सूत्र संचालन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या लिखित श्रद्धांजली संदेशाचे वाचन करण्यात आले. तर, डॉ. स्वामी रामेश्वरानंद, प्रवीणजी तोगडिया, राजाभाऊ भाले यांनीही लिखित स्वरूपात श्रद्धांजली संदेश पाठवले होते. या श्रद्धांजली सभेसाठी हजारो नागरिक, कार्यकर्ते व संघ पदाधिकारी उपस्थित होते. एमआयटी कॉलेजच्या मंथन सभागृहात ही सभा संपन्न झाली.
मधुभाईंचे कौटुंबिक प्रतिनिधी म्हणून त्यांचे पुतणे विनयजी कुलकर्णी उपस्थित होते. ते म्हणाले, “काका पूर्णवेळ संघ समर्पित असल्यामुळे आम्हाला त्यांचा सहवास कमी लाभला. परंतु जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा त्यांनी आम्हाला संघाचे विश्लेषण करून सांगितले. त्यांनी आम्हाला सांगितले संघ ज्ञानेश्वरी सारखा आहे. संघ जेवढा तुम्ही समजून घ्याल तेवढा अधिक उलगडत जाईल असे ते सांगत. आमचे मोठे काका नरहर कुलकर्णी यांच्यामुळे मधुभाई संघाकडे आकर्षित झाले. आध्यात्मिक साधना आपण केलीच पाहिजे, पण लढवय्या हिंदूची देशाला गरज आहे असे ते सांगत.”
भय्याजी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, “मधुभाईंचा स्वभाव कोणीही त्यांनाही सहज मनातले मोकळेपणाने बोलेल असा मधुर होता. त्यामुळे त्यांचे स्वयंसेवकच नाही तर त्यांच्या कुटुंबातील माता भगिनींनी जिव्हाळ्याचे नाते होते. ते म्हणायचे समाज जीवनात आपण उभे आहोत आणि आपल्याबद्दल समाजाची विश्वासार्हता कुठेही कमी होणार नाही ही आपली जबाबदारी आहे. मधुभाईंना संघ पूर्ण समाजाला होता म्हणून ते कृतीत उतरवू शकले. तत्त्वज्ञानापेक्षा व्यवहार करण्यावर त्यांनी भर दिला.
अनिलजी भालेराव यांनीही आपल्या मनोगतात काही आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “मधुभाई मला प्राथमिक वर्गाला जाण्यासाठी आई वडिलांना भेटण्यासाठी 80 किमी दूर गावी आले. 30 किमी पायी चालत आले होते. त्या काळात प्रतिकूल अवस्थेत. लोकांमध्ये राहणे, भेटणे हेच त्यांचे टॉनिक होते. डॉक्टरांनी प्रवास कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळे मधुभाई स्कूटरवर प्रवास करायला लागले. कार्यालयात असताना कधी कधी जेवण मिळत नसत. तर शिधा शिजवून खिचडी करून खाल्ली. आणीबाणी काळात ते वेश बदलून राहिले. माधव सोनटक्के असे नाव त्यांनी धारण केलं होतं. त्याचा वेश इतका पक्का होता की पोलिसांना ते कधीही सापडले नाही.
जीवन परिचय:
मधुभाई कुलकर्णी यांचे जीवन संपूर्णपणे संघकार्य आणि समाजहितासाठी अर्पण झाले होते. १९६२ मध्ये ते पूर्णवेळ प्रचारक झाले. तालुका, जिल्हा, विभाग, पुणे महानगर, गुजरात प्रांत, पश्चिम क्षेत्र प्रचारक अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुढे ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, तसेच २०१५ पर्यंत कार्यकारिणी मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात झालेले पुण्यातील तळजाई शिबिर संघकार्याच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे मानले जाते. संघविचार नवीन कार्यकर्ते व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी “अथातो संघजिज्ञासा” हे पुस्तक लिहिले, ज्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. अखेरच्या काळापर्यंत ते शाखा, प्रवास, संवाद व कार्यक्रमांत सक्रिय राहिले. त्यांच्या आजारपणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून चौकशी केली होती, तर सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी हेडगेवार रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती.