
छत्रपती संभाजीनगर|
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ‘सृजन’ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित DIPEX–२०२६ विज्ञान व नाविन्य प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ रविवार, दि. ०८ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडला. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा या वेळी गौरव करण्यात आला.
या समारंभास प्रा. मनीष जोशी (सचिव, विद्यापीठ अनुदान आयोग) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. विनोद मोहीतकर (संचालक, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य), श्री. देवदत्त जोशी (राष्ट्रीय सह संघटन मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद), प्रा. डॉ. कारभारी काळे (कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ), मा. ना. अतुल सावे (अध्यक्ष, स्वागत समिती) तसेच स्वागत समितीचे अध्यक्ष उद्योजक श्री. राम भोगले, महानगर मंत्री चिन्मय महाले, प्रांत तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्यसंयोजक हरजिंदर सिंग, स्वागत समिती सहसचिव श्री प्रवीण घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समारोप प्रसंगी बोलताना प्रा. मनीष जोशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता (Creativity), आत्मविश्वास (Confidence) आणि समूहामध्ये काम करण्याची क्षमता विकसित होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. “One Idea, One Life” या भावनेतून विद्यार्थ्यांनी सातत्याने संशोधन करत राहावे, संदर्भांचा अभ्यास करून आपल्या कल्पनांमध्ये सुधारणा करत राहावे, असे त्यांनी नमूद केले. सरकारच्या स्तरावरही DIPEX सारख्या उपक्रमांना सहकार्य मिळत असल्याचे सांगत प्रत्येक विद्यापीठाने अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच SWAYAM या ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये DIPEX मधील उत्कृष्ट विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी उल्लेख केला.
डॉ. विनोद मोहीतकर यांनी DIPEX मध्ये सहभागी झालेल्या डिप्लोमा विद्यार्थ्यांना २ अकॅडमिक क्रेडिट देण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. राज्यातील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

श्री. देवदत्त जोशी यांनी विद्यार्थ्यांनी केवळ स्क्रीन टाइममध्ये अडकून न राहता “Screen Time to Activity Time” या दिशेने वाटचाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. “Students Power is Nation’s Power” असे नमूद करत DIPEX हा विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष उत्पादनामध्ये रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील विविध समस्यांना उत्तर देणारे प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी DIPEX मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ स्तरावर अकॅडमिक मूल्यांकन (क्रेडिट) देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच DIPEX मध्ये सादर झालेल्या उत्कृष्ट प्रकल्पांना स्टार्टअप कंपनीच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कृषी, जिओस्पेशियल तंत्रज्ञान, अॅग्रो टेक्नॉलॉजी आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांतील प्रकल्प विशेष उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
मा. ना. अतुल सावे यांनी राज्यातील तरुणांमध्ये असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नाविन्यपूर्ण विचार देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना आपली कल्पकता सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने DIPEX च्या माध्यमातून केले आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदर्शनातील ग्रीन हायड्रोजन विषयावरील प्रकल्प विशेष उल्लेखनीय असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावर्षीच्या DIPEX–२०२६ प्रदर्शनाला महाराष्ट्र व गोवा राज्यातील अभियांत्रिकी, आयटीआय व तंत्रनिकेतन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वयंचलित नोंदणी संकेतस्थळाद्वारे एकूण २६६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यामध्ये डिग्रीचे १५६०, डिप्लोमाचे ९१९ आणि आयटीआयचे १२५ अर्ज समाविष्ट होते.

महाराष्ट्रातील ११ प्रादेशिक केंद्रांवर आयडिया प्रेझेंटेशन फेरी आयोजित करण्यात आली होती. या फेरीत सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
प्रदर्शनासाठी एकूण ३८९ प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ३५३ प्रकल्प प्रत्यक्ष सादर झाले. यामध्ये डिप्लोमा – १३२, डिग्री – १४५ आणि आयटीआय – ७६ प्रकल्पांचा समावेश होता. या प्रदर्शनात एकूण १३३९ विद्यार्थी सहभागी झाले असून त्यामध्ये ८४७ विद्यार्थी व ४९२ विद्यार्थिनींचा समावेश आहे. हे प्रकल्प महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यांतून सादर करण्यात आले.
समारोप प्रसंगी उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला छत्रपती संभाजीनगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ४० हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक व उद्योजकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.