
अमळनेर १९.०३.२०२६
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण नदी, पर्वत, हिमालय, पशु, प्राणी, वृक्ष सर्वांमध्ये एकच चेतना पाहतो. पण सर्वांचे पालन करणारी भूमी आहे. या भूमीसाठीही आपल्याला विचार करावा लागणार आहे. आपल्या एकच पीक घेण्याच्या पद्धतीमुळे आणि रसायनांच्या अतिवापरामुळे भूमी विषयुक्त बनत आहे. जास्त पीक आणि उत्पन्न काढण्याच्या स्पर्धेमध्ये आपण आपल्या व येणाऱ्या पिढीचे आरोग्य संकटात टाकत आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी किमान अर्धा एकर तरी सेंद्रिय शेतीसाठी जमीन राखीव ठेवावी असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आज अमळनेर येथे केले. ते भूमी सुपोषण व संरक्षण अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

शेतकरी बांधवांना विषयुक्त व जीवघेण्या अन्नधान्य, भाजीपाला, फळे याबाबतच्या वस्तूस्थितीची भयावहता समजावून सांगण्यासाठी व शेतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी ‘भूमी सुपोषण व संरक्षणा अभियान’ अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह संस्थान यांच्या माध्यमातून आज प्रारंभ झाले. या अभियानाचे हे आठवे वर्ष आहे. या कार्यक्रमामध्ये पूज्य श्री नृसिंहविजय सरस्वती (विठ्ठल आश्रम मध्य प्रदेश), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य श्री भागैय्या जी, पद्मश्री सुभाषजी शर्मा, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील घनवट उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चाराने भूमिपूजन करण्यात आले. सूत्र संचालन प्रा. नवलजी रघुवंशी यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये सेंद्रिय शेतीला प्राधान्य व विषमुक्त शेतीसाठी शेतकरी बांधवांना व उपस्थित नागरिकांना आवाहन केले. कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण म्हणाले, “आपल्या संस्कृतीमध्ये आपण भूमीला माता मानतो. त्यामुळे आपल्या मातेची काळजी घेणे आपले आद्य कर्तव्य आहे. सेंद्रिय शेती केली तर उत्पादन कमी येईल हा गैरसमज आहे. शेतीसाठी रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे केवळ मानवाचेच नाही तर पशुपक्षी, प्राणी व एकूणच आपली वसुंधरा संकटात आली आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्न करावे लागेल असे ते म्हणाले.
"शेतकरी राजा आहे, परंतु आज तो परावलंबी झाला आहे, हे चित्र बदलावे लागेल" - श्री भागैय्याजी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य श्री भागैय्याजी म्हणाले, “शेतकऱ्याला राजा म्हटले जाते. त्यामुळे आपल्याला राजासारखे वागावे लागेल. शेतकरी केवळ स्वतःचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता पूर्ण समाजाचा देशाचा आणि या सृष्टीचा विचार करतो. म्हणून आपल्याला राजा म्हटल्या जाते. परंतु वर्तमान परिस्थितीत अधिक उत्पन्न घेण्याच्या स्पर्धेमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे आपल्या अन्नामध्ये आणि सृष्टीमध्ये विषयुक्त अन्नधान्य निर्माण होत आहे. असेच चालू राहिले तर आपले पुढची पिढी कशी जगेल? कृषी रसायने तयार करणाऱ्या विदेशी कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाई करतात.

आजचा शेतकरी यंत्रासाठी, रसायनांसाठी, कीटकनाशकांसाठी, खतांसाठी विदेशी कंपन्या आणि सरकारवर पूर्णपणे परावलंबी झाला आहे. आणि हे काही सुचिन्ह नाही. शेतकरी राजा असेल तर परावलंबी होऊन कसे चालेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्याकडे सेंद्रिय शेती सुरू असती तर आज गॅस साठी दुसऱ्या देशावर अवलंबून होण्याची गरज निर्माण झाली नसती असे सांगत त्यांनी युद्धजन्य परिस्थितीत निर्माण झालेल्या गॅस टंचाईवर लक्ष वेधले. ते म्हणाले, “पूर्वी आपल्याकडे बायोगॅस मोठ्या प्रमाणात तयार होत होता. जर आपण सेंद्रिय शेती करत असतो, आपल्या घरात देशी गाय असती तर ही वेळ आली नसती. आजची ही आव्हाने आपल्याला पुन्हा पारंपारिक सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी सुचित करत आहे असे सांगून त्यांनी सेंद्रिय शेतीसाठी आवाहन केले.

भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठल्याही चांगल्या कामाच्या यशस्वितेसाठी संतांचे आशीर्वाद घेण्याची आपली परंपरा आहे. त्यानुसार श्री नृसिंहविजय सरस्वती यांनी आशीर्वचन केले. त्यांनी वर्ष प्रतिपदा व नवीन वर्षाचे महत्त्व सांगितले. भगवान वराह यांनी वसुंधरेला वाचवले तो आजचा दिवस. या पवित्र दिवशी आपण वसुंधरेला वाचवण्यासाठी सुरू केलेली ही चळवळ यशस्वी होवो असा आशीर्वाद त्यांनी दिला.
शेंद्रीय शेती उत्पादन च दिर्घायु देऊ शकते
जगण्यासाठी हे कार्य करावे लागेल
जीवन मरणाचा संबंध आहे????????????????
मनोज प्रतापराव कमटे
20 Mar 2026 09:52