
जळगांव: चित्रपट सृष्टी आणि भारतीय दृष्टी या संकल्पनेच्या आधारावर अजिंठा फिल्म सोसायटी एक एक पाऊल पुढे जात आहे. ५व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या अभुतपुर्व यशानंतर अजिंठा फिल्म सोसायटीच्या विविध उपक्रमांपैकी 'टुरिंग टाँकीज' या लोकप्रिय उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर खास शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासाठी जळगावातील पहिल्या 'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
अजिंठा फिल्म सोसायटीद्वारा आयोजित,रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालक शाळा आणि बालरंगभूमी परिषद या दोन संस्थांच्या मदतीने पहिलाच 'गंमत जंमत' हा पालक-बालक चित्रपट महोत्सव खूपच उत्साहात संपन्न झाला. दिनांक २४,२५,२६ एप्रिल रोजी जळगाव मधील भाऊंचे उद्यानातील एम्फी थिएटर येथे झालेल्या या महोत्सवाला अपेक्षेपेक्षाही उदंड प्रतिसाद मिळाला.
अशा प्रकारच्या चित्रपट महोत्सवाचे, ज्यात मुलं आणि पालक एकत्र बसून चित्रपट बघण्याचा निखळ आनंद घेतील. ज्यातून मुलांना आणि पालकांना देखील काही वेगळे केल्याचे समाधान मिळेल, याबरोबरच पारंपारिक पद्धतीने मुलं आणि पालकांतील संबंध दृढ करण्यापेक्षा चित्रपटाच्या माध्यमातून चांगले विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांना काही काळ समाज माध्यमांच्या जोखडातून मुक्त ठेवण्याचा एक प्रयत्न या हेतूने महोत्सवाचे आयोजन केले होते. अशा पद्धतीचा मुलं आणि पालक यांनी एकत्र बसून चित्रपट बघावेत असा पहिलाच प्रयोग असल्यामुळे मनात थोडी साशंकता होती.

गेल्या काही दिवसात जळगाव मध्ये वाढलेले तापमान हा देखील त्या भीती मागचा आधार होता. मुळातच ओपन थिएटरमध्ये अशा पद्धतीने एल.ई.डी वर चित्रपट दाखवणे आणि त्यासाठी किती मुले पालक एकत्र येतील किती वेळ बसतील अशा अनेक शंका कुशंका मनात त्यापूर्वी होत्या. पण महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बसण्याच्या सर्व जागा भरून कोपऱ्याकोपऱ्यातील अडचणीच्या जागी सुद्धा मुले आणि पालकांनी तास - दीड तास उभे राहून चित्रपट बघितले यातच या महोत्सवाची यशस्विता सामावली.
मुळातच हे चित्रपट हे नेहमीचे, माहितीचे नव्हते तर प्रतिवर्षी आयोजित होणाऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मधल्या बालचित्रपट विभागातील विजेत्या फिल्म चे सादरीकरण होते. चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी जळगाव शहराच्या महापौर सौ.दीपमाला काळे या उपस्थित होत्या.फिल्म सोसायटीच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठीच्या अश्या उपक्रमात महानगरपालिका सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
पहिल्या दिवशी 'शाळा सुटली' ही शॉर्ट फिल्म आणि 'बेबीज डे आऊट' हा लहान मुलांबरोबरच मोठ्यांना आवडलेला चित्रपट दाखविण्यात आला. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीदुसऱ्या दिवशी उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी श्री.निलेश पाटील हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत करण्यासाठी अश्या प्रकारचे उपक्रम दिशादर्शक ठरतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'मटर पनीर', 'मंग्या' ,'रिबेल ' आणि 'देवा तुला कुठे शोधू' या उत्तम शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात आल्या.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अर्थात समारोपीय सत्रात रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.राजेंद्र गुंजाळ हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री.दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'रणपती शिवराय स्वारी आग्रा' हा अडीच तासाचा चित्रपट दाखविण्यात आला.छत्रपती शिवराय हा प्रत्येक भारतीयांचा श्रद्धेचा विषय असल्याने महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आतापर्यंतचे गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांची सहभागिता वाढविण्यासाठी प्रत्येक चित्रपटांवरती त्यांना काय वाटले आणि एकूण महोत्सवाच्या संबंधात त्यांची लिखित मते मागविण्यात आली आणि शेवटच्या दिवशी त्यातल्या काही चांगल्या प्रतिक्रियांना बक्षीसे सुद्धा देण्यात आली.प्रसार माध्यमांनी देखिल या महोत्सवाची दखल घेत उत्तम प्रसिद्धी दिली. रेडिओ सिटी माय एफ एम यांनी रेडिओ पार्टनर म्हणून जवाबदारी सांभाळली.
या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अजिंठा फिल्म सोसायटी शालेय विद्यार्थी आणि पालकांमध्ये पोचण्यात यशस्वी झाली आहे. समाजामध्ये चित्र साक्षरता रुजवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल.या महोत्सवाच्या यशस्वीतेमुळे सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आणि आगामी काळात अशा शालेय स्तरावर चित्रपटांचे स्क्रिनींग करुन बालवयापासून चित्र साक्षरता रुजवण्याचा निर्धार सर्वांनी केला. अशी माहिती देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी दिली.