छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई (माधव) विनायक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा दिनांक २४ सप्टेंबर २०२५, बुधवार रोजी सायं. ७.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील सातारा परिसरातील एम. आय. टी. कॉलेजमधील ‘मंथन सभागृहात’ होणार आहे.
या सभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मा. दत्तात्रयजी होसबले, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मा. भैय्याजी जोशी यांच्या सह संघाचे अनेक स्वयंसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
मधुभाई कुलकर्णी यांचे जीवन संपूर्णपणे संघकार्य आणि समाजहितासाठी अर्पण झाले होते. १९६२ मध्ये ते पूर्णवेळ प्रचारक झाले. तालुका, जिल्हा, विभाग, पुणे महानगर, गुजरात प्रांत, पश्चिम क्षेत्र प्रचारक अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या. पुढे ते अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख, तसेच २०१५ पर्यंत कार्यकारिणी मंडळाचे सदस्य होते. त्यांच्या कार्यकाळात झालेले पुण्यातील तळजाई शिबिर संघकार्याच्या इतिहासात विशेष महत्त्वाचे मानले जाते.
संघविचार नवीन कार्यकर्ते व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी “अथातो संघजिज्ञासा” हे पुस्तक लिहिले, ज्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. अखेरच्या काळापर्यंत ते शाखा, प्रवास, संवाद व कार्यक्रमांत सक्रिय राहिले. त्यांच्या आजारपणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी फोनवरून चौकशी केली होती, तर सरसंघचालक डॉ मोहनजी भागवत यांनी हेडगेवार रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस ही केली होती.
त्यांच्या जाण्याने संघपरिवारासह समाजजीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. श्रद्धांजली सभेत मान्यवर त्यांना शब्दांजली अर्पण करतील व त्यांच्या कार्याची उजळणी करतील. नागरिकांनी या सभेला उपस्थित राहून दिवंगत मधुभाईंना आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*****
भावपुर्ण श्रद्धांजली
सुरेश गोपाळ राव जोशी
24 Sep 2025 14:03
भावपूर्ण श्रद्धांजली ????
रेणुकादास कुलकर्णी
23 Sep 2025 18:16