स्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक, महानायकांना छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चरित्रातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची उर्जा मिळाली.अशा महान राजाचा राज्याभिषेक सोहळा आमच्यासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. श्रीशिवराज्याभिषेकदिन अर्थात हिंदु साम्राज्यदिन हा उत्सव देशभर साजरा केला जातो. विजयनगरच्या पराभवानंतर हिंदु समाज आत्मविस्मृत झाला होता. हिंदु राजा होऊच शकत नाही,अशा प्रकारची मानसिकता निर्माण झाली होती.अशा परिस्थितीत शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाचा क्रांतिकारी निर्णय घेतला.
राज्याभिषेकासाठी गागाभट्टांना निमंत्रित करण्याचे ठरले. गागाभट्ट मूळ पैठणचे! 'कलियुगीचा ब्रह्मदेव' अशी त्यांची ख्याती होती.काशीक्षेत्री अग्रपुजेचा मान मिळालेला हा विद्वान तत्कालीन भारतातील सर्वश्रेष्ठ पंडित होता. त्यांच्या या असामान्य विद्वत्तेमुळे छत्रपती शिवाजीमहाराजांसारख्या पराक्रमी सूर्याच्या राज्याभिषेकासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. राज्याभिषेकासाठी गागाभट्टांनी ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ,शके 1596 हा मुहूर्त काढला. यावेळी त्यांनी 'राज्याभिषेकप्रयोग' नावाचा ग्रंथही लिहिला.
रायगड किल्ल्यावर शिवाजीमहाराजांना राज्याभिषेक होणार होता. रत्नशाळेचे आधिकारी आणि रामाजी दत्तो 32 मण सुवर्णसिंहासन साकारत होते. यज्ञशाळा सजल्या होत्या. सप्तनद्यांचे जल रायगडावर आणण्यात आले. विशेष म्हणजे इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री आॅक्झिंडन हाही मौल्यवान नजराणे घेऊन रायगडाच्या वाटेला लागला होता. शिवाजीमहाराजांनी छत्र धारण करण्यापूर्वी प्रतापगडावर श्रीभवानीमातेस सुवर्णछत्र अर्पण केले.
शिवराज्याभिषेक म्हणजे शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ आऊसाहेब यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पुर्तीचा क्षण! याचदिवशी हिंदु समाजाचे सुतक फिटले. विजयनगरसह हिंदु सिंहासनाच्या जखमा आज बुजल्या होत्या. हिंदुचा सार्वभौम राजा आणि स्वतंत्र सिंहासन निर्माण झाले होते. सभासद लिहीतो " या युगी सर्व म्लेंच्छ बादशाह.मराठा बादशाह एवढा छत्रपती जाला.ही गोष्ट सामान्य जाली नाही."
सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून शिवाजीमहाराजांनी स्वतःच्या मस्तकावर छत्र धारण करून स्वतः स छत्रपती म्हणविले. राज्याभिषेकाच्या दिवसापासून 'राज्याभिषेक शक' ही कालगणना सुरु केली. महाराज शककर्ते राजे झाले. स्वतःच्या नावाने श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे असलेली सोन्याची नाणी पाडली. हिंदु समाजाचे नवचैतन्य शिवराज्याभिषेकाने जागृत झाले. त्यातुनच पुढे आसेतूहिमाचल संघर्ष करुन मराठ्यांनी मुघल सत्तेचे निर्दाळण केले. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. जेव्हा जेव्हा आपल्या देशावर आणि धर्मावर संकटे येतील आक्रमणे होतील तेव्हा तेव्हा शिवरायांचा हा अपूर्व सोहळा आम्हाला प्रेरणा देत राहील. एवढे या राज्याभिषेकाचे महत्व आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांच्या उक्ती आणि कृतीमागे 'स्वत्व'रक्षणाची प्रेरणा आपल्याला दिसून येते,त्याची काही उदाहरणे पाहुया
वरील बाबींचा विचार करुन सर्व राष्ट्रप्रेमी आणि अर्थातच शिवप्रेमी बंधु-भगीनींनी तिथीचा आग्रह धरणे गरजेचे आहे. यावर्षीचा राज्याभिषेक दिन हा तिथीनुसार रायगडावर साजरा होणार आहे, याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभारच मानले पाहिजे,पण यापुढेही आपला तिथीचाच आग्रह असला पाहिजे, तरच आपण छत्रपती शिवरायांचा स्वत्व रक्षणाचा विचार आचरणात आणतो असे म्हणावे लागेल.