
जळगांव: आजच्या युगात रील्स आणि शॉर्ट फिल्म निर्मिती क्षेत्रात युवा वर्गाचे मोठे योगदान आहे. ह्याच युवा वर्गाच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी खान्देश व मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी *योफिमा शिष्यवृत्ती* अर्थात 'यंग फिल्म मेकर फेलोशिप' सलग तिसऱ्या वर्षी घेऊन येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज स्वातंत्र्य दिनी जळगाव येथे करण्यात आला.
सुप्रसिद्ध अभिनेता,लेखक ,दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण या योफिमा (YOFIMA) योजनेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
मराठवाडा व खान्देश परिक्षेत्रात चित्रपट निर्मितीसाठी ची सर्जनशीलता असूनही अनेक तरुण चित्रकर्मींना आर्थिक मदती अभावी आपली सर्जनशीलता व कलाकृती जगासमोर मांडता येत नाही अशा लघुपट निर्माते किंवा युवा.चित्रकर्मींना आपली कला जगासमोर मांडता यावी यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी खान्देश व मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी *योफिमा शिष्यवृत्ती* अर्थात यंग फिल्म मेकर फेलोशिप प्रोग्राम योजना यावर्षी देखील आयोजित करत आहे. या योजनेत खान्देश व मराठवाडा भागातील म्हणजेच जळगाव,धुळे,नंदुरबार,छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड,लातूर इ.जिल्ह्यातील १८ ते ३० वयोगटातील प्रतिभावान युवा चित्रकर्मींना सहभागी होता येणार आहे. योजनेत नोंदणी झालेल्या युवा चित्रकर्मींपैकी निवड समितीतर्फे निवड झालेल्या सर्वोत्कृष्ट ६ कलाकृतींच्या निर्मिती साठी प्रत्येकी रु.२५०००/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम मिळणार आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या प्रत्येक युवा फिल्ममेकर्स ना लघुपट निर्मिती साठी आवश्यक मार्गदर्शन तसेच कथा निवड, लेखन,दिग्दर्शन,पोस्ट प्रोडक्शन इ.विषयांच्या कार्यशाळेत मोफत सहभागी होता येणार आहे.या सर्व कार्यशाळांमध्ये चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखक, दिग्दर्शक,कलावंत मार्गदर्शन करणार आहेत.या योजनेत सहभागी होण्यासाठी दि.१० सप्टेंबर २०२६ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे.

या योजनेचा शुभारंभ सोहळा दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी जळगावातील नुतन मराठा महाविद्यालय व रोटरी भवन येथे मान्यवरांच्या हस्ते *YoFiMa* चे पोस्टर विमोचन करुन उत्साहात संपन्न झाला . या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख,रोटरी चे अध्यक्ष श्री.योगेश राका,अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव श्री.विनीत जोशी,सह सचिव डॉ. सुचित्रा लोंढे,डॉ.जयेंद्र लेकुरवाळे,श्री.पियुषभाई रावळ,श्री.पार्थ ठाकर,विभाग संयोजक श्री.कमलाकर रुगे, सह संयोजक डॉ.सचिन कुंभार इ.मान्यवर उपस्थित होते. अजिंठा फिल्म सोसायटीच्या वतीने डॉ.लेकुरवाळे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली.
या योजनेचा अधिकाधिक युवा चित्रकर्मींनी लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी 9892906374,9373035535,7057344411,9595430774 yofima2025@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन योफिमा आयोजन समितीचे प्रमुख मार्गदर्शक लेखक, अभिनेता प्रा.योगेश सोमण, डॉ.जयंत शेवतेकर,प्रांत संयोजक किरण सोहळे यांनी केले आहे.
