
तत्कालीन काळात देशात असलेल्या परकीय राजवटीत येथील जनसामान्यांचे बेहाल झाले होते. त्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत होती. आपल्या स्वदेशातच भूमीपुत्रांना स्थान उरले नव्हते. यवनी आक्रमणाच्या लाटेमागून लाटा येत होत्या. हे आक्रमण परतवून लावण्यासाठी शिवछत्रपतींनी ध्येयवाद, राष्ट्रप्रेम, जिद्द या गुणांच्या बळावर अत्याचाराविरुद्ध, अनाचाराविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढता येते हा भाव मावळ्यांच्या ठायी उभा केला होता. हे आक्रमण परतवून शिवाजी महाराजांसोबत ते ठामपणे उभे राहिले. या मावळ्यांनी गाजविलेल्या पराक्रमी, तेजस्वी इतिहासाचे निर्माते किंबहुना त्याचे भाग्यविधाता म्हणजे राजा शिवछत्रपती.
मतदानाच्या आजच्या काळात आपण तळागाळातील माणसाच्या उद्धाराबाबत बोलतो पण महाराजांनी खरोखरच दीनदलितांना, गोरगरिबांना जवळ केले आणि त्यांच्या हातून स्वराज्याचे बांधकाम करुन घेतले. तानाजी, येसाजी, नेताजी, बाजी ही सर्व नावे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात.
छत्रपतींच्या गुणवत्तेचा वेध घेण्याचा प्रयत्न समर्थ रामदासांनी यापूर्वीच केला आहे. छत्रपतींचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,
निश्चयाचा महामेरू। बहूत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।।
या श्रीमंतयोग्याचे गुणगान करताना यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नितीवंत, जाणता राजा || या शब्दांत समर्थांनी छत्रपतींचा गौरव केला आहे. छत्रपती शिवरायांनी ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रमातून स्वराज्याची संकल्पना साकारली. महाराजांनी हे कल्याणकारी राज्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या उत्तम प्रशासनाचीही उभारणी केलेली दिसते. स्वराज्य या कल्पनेशी विसंगत अशा परंपरांगत बाबी महाराजांनी निपटून काढल्या.

मराठी राजभाषेचा गौरव
आज विविध क्षेत्रातील थोर मंडळी, जाणकार आग्रहपूर्वक सांगत आहेत की, मातृभाषेतून अध्यापन करत राहावे. अर्थात ते अधिक स्वाभाविकच आहे. शिवछत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी याच प्रकारचा आग्रह धरला होता. मराठीला राजभाषेचा गौरव लाभावा यासाठीच छत्रपतींनी राजव्यवहारकोशाची रचना केली. यवनी भाषेला पर्यायी प्रतिशब्द महाराजांनी निर्माण केले. भाषेबद्दल प्रेम कृतीतून व्यक्त केले.
राज्यकर्ते आणि प्रजाजन यांच्या विचारविनिमयाचे माध्यम एकच असावे या मताचे प्रतिपादन छत्रपतींनी केले नसेल पण त्यांची धारणा मात्र तीच होती. छत्रपतींनी राष्ट्रधर्माच्या परित्रणासाठी मातृभाषेचा आश्रय घेतला.
अष्टप्रधान मंडळ
तत्कालीन काळात यवनी राजवटीमुळे संपूर्णपणे मुसलमानी शासन व्यवस्था होती. ती मोडीत काढून शिवाजी महाराजांनी हिंदू पद्धतीने अर्थात पारंपारिक पद्धतीनुसार राजकारभाराची व्यवस्था लावून स्वतंत्र व सार्वभौम राज्याची निर्मिती केली. हिंदू पद्धतीने बदल करण्यात आलेली ही प्रशासनव्यवस्था जास्तीत जास्त लोकाभिमुख, भ्रष्टाचाररहित होईल, याला प्राधान्य दिले. कर्तबगारी या निकषावर आधारित ते मंत्रीमंडळ ठरवित असत. त्यानुसार त्यांनी राज्याची, राज्याच्या मंत्र्याची, अधिकाऱ्यांची, कर्तव्ये निश्चित केली.
अष्टप्रधान मंडळ हे शिवाजी महाराजांच्या केंद्रिय प्रशासनातील महत्त्वाचे अंग होते. शिवाजी महाराजांनी वेळोवेळी व गरजेनुसार मंत्र्यांच्या नेमणुका केल्या. राज्याभिषेकाच्यावेळी राजांचे परिपूर्ण असे अष्टप्रधान मंडळ अस्तित्त्वात आले. राज्याभिषेकाच्यावेळी त्यांच्या कार्यकक्षाही निश्चित करण्यात आल्या. अष्टप्रधानांच्या नेमणूका करताना जी प्रचलित फारसी नावे होती ती मात्र बदलून संस्कृत नावे पदांसाठी निश्चित केली.
लष्कर
त्यावेळची एकूण राजकीय परिस्थिती, महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, आर्थिक मर्यादा, परंपरागत सैन्यव्यवस्थेतील दोष या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी सैन्याची उभारणी केली. महाराष्ट्रात व विशेषत: ज्या प्रदेशात स्वराज्याची निर्मिती झाली तेथे हत्तीदळ, उंटदळ यांच्यापेक्षा पायदळाचा अधिक उपयोग करून घेण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे पायदळ हे लष्कराचे अत्यंत महत्त्वपूर्ण अंग होते. शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धतंत्राचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील आरमाराचा जनक म्हणून शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते.
हेरखाते
आपल्या राज्यात आणि शत्रू राज्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींची माहिती राजांना हेरामार्फत कळत होती. शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू व कार्यक्षम असे लोक हेरखात्यात होते. अनेक अशक्य अशा मोहिमा शिवाजी महाराजांनी यशस्वी केल्या. शत्रूच्या प्रदेशात जाऊन ते सहिसलामत परत आले. शत्रूची सधन शहरे लुटली अशा सर्व प्रसंगात ते यशस्वी झाले. त्याचे एक कारण म्हणजे त्यांचे प्रामाणिक आणि कार्यक्षम असे हेरखाते.
शिवकाळात सैन्यव्यवस्था व सैन्यप्रशासन हे कठोर शिस्तीचे होते हे लक्षात येते. युद्धसाहित्य, युद्धतंत्र लष्कर प्रशासन अस्तित्त्वात होते. शिवाजी महाराजांनी यातील दोष दूर करुन आपल्या परिस्थितीशी अनुकूल असे रूप त्याला दिले. सैन्याला शिस्तबद्धता, कार्यक्षमता, राज्यनिष्ठेची जोड दिली. शिवाजी महाराजांने सैन्य संख्येने कमी असले तरी ते यशस्वी होण्याची कारणे ही या लष्करी प्रशासन व्यवस्थेत दिसून येतात. या यशाने त्यांना आत्मविश्वास दिला.
आज्ञापत्रं
महाराज हे जसे समर्थ सेनानी होते. तसेच ते एक तत्पर प्रशासक पण होते. त्यांच्या प्रशासक दृष्टीचा दाखला म्हणून त्यांच्या काही पत्रांचा उल्लेख केला जातो. एका पत्रात ते आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देतात की, गरजेची कोणतीही गोष्ट विना मोबदला घेऊ नका. कोणाच्या दारी पडलेल्या भाजीच्या देठाकडे सुद्धा आसक्त नजरेने पाहू नका. लोकांची स्वराज्याकडे पाहण्याची श्रद्धा ढळेल, असे वर्तन करु नका.
शिवरायांनी जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांशी कसे वागावे याचे नीतिशास्त्रज्ञच सांगितलेले आहे. तुम्हाला गवत, धान्य, भाजीपाला, लाकूड हवे असेल तर बाजारातून योग्य मोबदला देऊन विकत आणावा. कोणाकडून जुलूम अथवा अत्याचार, भांडण करून घेऊ नका,’’ काटकसरीने वागा, अत्याचार करु नका, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अशा सक्त सूचना शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
जनावरे, गवत, शेतीमाल, शेतकरी याबाबत शिवाजी महाराज दक्ष असत. हे त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांवरुन स्पष्ट होते. ‘‘संध्याकाळी झोपताना चुली, आगट्या विझवून झोपत जा. अन्यथा विस्तव गवताला, पिकाला, लाकडाला लागेल आणि ते भस्मसात होईल. तेलाचा दिवा विझवत जा, अन्यथा पेटती वात उंदीर घेऊन जाईल व गवत, लाकूड, धान्य जळून जाईल. त्यामुळे पागा बुडेल, शेतकरी नष्ट होईल. त्यामुळे दक्ष राहा.’’ आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आग लागूच नये, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

टंचाईप्रसंगी शिवाजीराजे आपल्या सुभेदाराला सांगतात, ‘‘कष्ट करुन गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसुल वीडीदिडीने करू नका. केवळ मुद्दलच हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल.’’ आपल्या राज्यातील मजूर, गरीब, शेतकरी सुखी राहिला पाहिजे. तो उपाशी झोपता काम नये, त्यासाठी तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल, ही शिवरायांची भूमिका होती. त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले, हे त्यांच्या आदेशावरुन स्पष्ट होते.
संदर्भ : मराठ्यांच्या इतिहासाची साधने - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, खंड ८, पान नं. ८२
शिवछत्रपतींची लष्करास ताकीद - http://samagrarajwade.com/index.php/marathyanchya-itihasachi-sadhane-khand-1/marathyanchya-itihasachi-sadhane-khand-8?start=81
नैतिकता
शिवाजीराजांचे स्त्री विषयक धोरण अत्यंत आदराचे होते. परस्त्रीस मातेसमान लेखणाऱ्या व शत्रूच्या स्त्रियांचा सन्मान करणाऱ्या शिवाजी महाराजांनी सैन्याला सक्त आदेश दिले होते. स्त्रियांना मोहिमेवर आणू नये. त्यांना युद्धात पकडू नये. स्त्रीसंबंधी गुन्ह्याला क्षमा नव्हतीच व कठोर शिक्षाही होती. मग तो कुणीही असो. साधा शिपाई, वतनदार, किल्लेदार कुणालाही माफी नव्हती. हातपाय तोडणे, देहदंड, डोळे काढणे आदी शिक्षा दिल्या जात. स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावच्या मुकादमाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा शिवछत्रपतींनी केला होता.
धर्मांतरणाचे शुद्धीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभेद, वर्णव्यवस्थेची कधी तमा बाळगली नाही. धर्मांतराचे शुद्धीकरण हा महाराजांच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. जे कोणी सक्तीने बाटविले जात होते. त्यांना पुन्हा धर्मछत्राखाली घ्यावे, हा महाराजांचा आग्रह होता. धर्म हा समाजाच्या धारणेसाठी असतो, हा विचार छत्रपतींनी प्रमाणभूत मानला.
रयतेचा आणि शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा
ज्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला गेला तिथे शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सोन्याचा नांगर फिरवला आणि एका सुवर्णयुगाची सुरुवात केली. वैराण झालेल्या जमिनीला पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
स्वराज्यातील शेतीमालाला रास्त भाव मिळेल, याकडे शिवरायांनी लक्ष दिले. अतिरिक्त शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला. तो परमुलखात नेऊन विकण्याची सोय केली.
शिवाजी महाराजांच्या या धोरणी वृत्तीमुळे शेतकऱ्यांची शेती करण्याची क्रियाशिलता वाढीस लागली. याचा परिणाम म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील १०० टक्के जमीन लागवडीखाली आली. शेतकरी समृद्ध झाला. त्याची खरेदी कुवत वाढली. त्यामुळे त्यामुळे विणकर, चांभार, गवंडी, सुतार, लोहार, कुंभाराला काम मिळाले. अशीच कामे १२ बलुतेदारांना देऊन त्याच्याही हाताला काम दिले. या सगळ्यांना सुखी आणि समृद्ध केले. यामुळे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात प्रत्येकाच्या मनात नवा विचार निर्माण झाला की शिवाजी महाराजांमुळे आपल्याला मिळालेले हे सुख जर शाश्वत टिकवायचे असेल तर शिवाजी हा राजा टिकला पाहिले आणि त्याचे राज्य टिकले पाहिजे. यातूनच सामान्य जनता शिवाजी महाराज आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी सिद्ध झाले. यातूनच शिवाजी महाराजांनी बलाढ्य शत्रूशी संघर्ष करून स्वराज्याचे रक्षण केले. म्हणजेच ज्यावेळी एखाद्या राष्ट्रातील सामान्यातील सामान्य व्यक्ती स्वतःच्या घरचा विचार बाजूला सारून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडतो त्या राष्ट्राला, त्या समाजाला जगातील कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही, हे नवे तत्वज्ञान शिवाजी महाराजांनी जगाला दिले. अशा पद्धतीने महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आहे.
शिवरायांच्या महत्तेचे गमक
महाराजांच्या महत्तेचे नेमके गमक उलगडताना एक इतिहास संशोधक म्हणतात, जे झोपी गेलेले होते त्यांना महाराजांनी जागे केले, जे मूळातच जागे होते त्यांना महाराजांनी उभे केले. जे उभे होते त्यांना महाराजांनी चालते केले. आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण दिले. या आद्यस्वातंत्र्यवीराने पारतंत्र्याच्या घनतिमिरात स्वराज्य आणि स्वातंत्र्य या कल्पनांचे दीप उजळले.
वर्तमानपत्रे, आकाशवाणी, टीव्ही ही जनसंपर्काची साधने नसताना, मोटारी, गाड्या आणि विमाने ही दळवळणाची साधने नसताना अराजकाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांनी रामराज्य उभे केले. छत्रपतींनी हे सर्व नाव, प्रसिद्धी, व्यक्तिगत लाभासाठी केले नाही तर त्यांनी जे केले ते समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी.
आम्ही सगळेजण एक आहोत, ही भावना ज्याच्या ठायी वसते त्यांचेच फक्त राष्ट्र असू शकते. या जाणिवेला वंचित झालेला लोकसमूह राष्ट्र या संज्ञेस पात्र ठरू शकत नाही. महाराजांनी ही एकात्मतेची जाणिव लोकमानसात निर्माण केली आणि एक हिंदू राष्ट्र अस्तित्वास आणले. जातीधर्माचा बडिवार माजवून आपपरभाव निर्माण करण्याचे पातक छत्रपतींनी कधीच केले नाही. पण देशावर चहुबाजूंनी आक्रमण होत असल्यामुळे महाराजांना हिंदू धर्म, समाज आणि संस्कृती यांचे रक्षण करायचे होते. मानवाच्या प्रतिष्ठेहून उदात्त तत्त्व असू शकत नाही, हे शिवाजी महाराज जाणून होते.
महाराजांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणारे समकालीन इंग्रज होते, पोर्तुगीज होते. त्यांची महाराजांविषयी भावना शुद्ध नव्हती. पण तरीही महाराजांची थोरवी ते मानत होते. याचे कारण म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत गरजा. आपल्या गरजा सैनिकापुरत्याच मर्यादित ठेवल्या होत्या. गरिबी हटविण्यासाठी गरीब होण्याची तयारी दाखविणारा हा गरिबांचा राजा मनाने श्रीमंताहूनी श्रीमंत होता. नव्हे तो एक श्रीमंतयोगी होता. महाराजांना स्वत:चे एक जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. त्यांची सत्त्वसंपन्न माता, त्यांचे पराक्रमी वडील शहाजी राजे, त्यांना घडलेला संतसहवास आणि त्यांनी स्वत: केलेले जीवनचिंतन या सगळ्याचा तो परिपाक होता. तुकाराम महाराजांचे कीर्तन त्यांनी ऐकले होते. समर्थ रामदासांचे महाराष्ट्र धर्माचे विवेचन त्यांना ज्ञात होते. जिवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या सहवासात मानवी मनाची एक वेगळी बाजू त्यांनी पाहिली होती. या सर्व गोष्टींचा प्रभाव त्यांच्या जीवनचिंतनावर पडला होता, ही वस्तूस्थिती आहे.
भारताच्या इतिहासात शिवछत्रपतींचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या इंग्रजी चरित्रकाराने त्यांना रचनात्मक प्रतिभेचा महापुरुष म्हटले आहे. यदुनाथ सरकार हे त्यांचे इंग्लिश चरित्रकार म्हणतात, पुण्याजवळच्या एका लहानशा जहागिरदाराचा मुलगा मुघलांशी स्पर्धा करतो आणि एवढे मोठे राज्य निर्माण करतो, ही एक अद्भूतरम्य गोष्ट आहे. छत्रपतींच्या जन्मापूर्वी हिंदू समाजात ऐक्याचा अभाव होता. मराठ्यांत केवळ हेवेदावे आणि झगडेच होते. सर्व समाज जातिभेदाने पोखरून गेला होता. यवनी अत्याचारामुळे अवघा समाज होरपळून गेला होता. कधीकाळी आपल्याला सन्मानाने जगता येईल, अशी आशा कोणालाही उरली नव्हती. अशावेळी दीनदलित आणि पीडित जनतेला संघटित करणारा, स्वाभिमानाची दिशा देणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या संघर्षमय आयुष्यातही पाय रोवून उभे राहत स्वराज्याची स्थापना केली.
महाराष्ट्रो जनपदस्तदानीं तत्समाश्रयात ।
अन्वर्थतामन्वभवत् समृद्धजनतान्वित: ।।
भारत-इतिहास संशोधक मंडळ, पुणे पुरस्कृत ग्रंथमाला क्रमांक ३ कवीन्द्र परमानन्दकृत श्रीशिवभारत अध्याय १० वा / श्लोक क्र. ३२, पान क्र. ८९) https://drive.google.com/file/d/0B_hbiN5lXt31NVVSZWxQQ3lVMnc/view
मत-मतांतरे :
शिवाजी महाराजांनी कधीही, कुठेही मशीद बांधली नाही. किंवा मशीदींना इनामे म्हणूनही दिली नाहीत.
(संदर्भ : dasbodh.com
विभाग : छत्रपती शिवराय
विषय १२: श्री शिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन : शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे , पान नं. १ ते ३)
(श्रीराजाशिवछत्रपती - चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे, व्याख्यान स्थळ - श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदिर, पुणे, दि. १० जुलै २०१५) (https://raigad.files.wordpress.com/2015/09/wpid-screenshot_2015-09-29-19-38-06-1.jpg)
https://raigad.files.wordpress.com/2015/09/wpid-screenshot_2015-09-29-19-38-06-1.jpg
गोव्यातील नार्वे गावात सप्तकोटीश्वराचे देऊळ पूर्वी पोर्तुगीजांनी पाडले होते, त्याआधी मुसलमानांनी पाडले होते. त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. तमिळनाडूमधील तिरूवण्णामलाई येथील शोणाचलपतीचं देऊळ पाडलेलं होतं. ते सुद्धा शिवाजी महाराजांनी हट्टाने परत बांधले. एक फ्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. तो फ्रायर कल्याण भिवंडीला जेव्हा आला होता तेव्हा तो म्हणतो, ‘‘इथे ज्या मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडता आल्या असत्या, पण त्याऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारे केली आहेत’’.

मुसलमान राज्यकर्त्यांनी पाडलेली देवळे, धर्मातरण
भारतातील मुसलमान राज्यकर्त्यांनी स्वधर्मावरील श्रद्धेमुळे देवळे पाडणे, परधर्मीयांना मुसलमान करणे, इत्यादी कृत्ये करण्याची इच्छा त्यांना होत असे, पण त्यांचे बहुसंख्य प्रजाजन हिंदू असल्यामुळे आणि त्यांच्या पदरी अनेक हिंदू अधिकारीही असल्यामुळे ती इच्छा त्यांना कित्येकदा दाबून ठेवावी लागे. व्यक्तीचा स्वभाव आणि परिस्थिती किंवा परिस्थितीविषयीची त्या व्यक्तीची कल्पना यांनुसार त्या प्रेरणांचा प्रभाव जसा कमी जास्त होईल तसा राज्यकर्त्यांच्या धोरणात फरक पडत असे. ज्या औरंगजेबाने तो शाहजादा असताना शांतिदासाचे देऊळ पाडले त्याच औरंगजेबाने, तो बादशाह झाल्यावर नवी देवळे बांधू देऊ नयेत, पण जुनी देवळे पाडू नयेत, अशा आशयाचे फर्मान काढले आणि त्याच औरंगजेबाने पुढे मथुरा, काशी इ. अनेक ठिकाणजी देवळे पाडली किंवा त्यांचे मशिदींमध्ये रूपांतर केले आणि मुसलमानेतरांवर जिझिया कर बसवला.
(उपर्युक्त फर्मानाकरिता पहा - द रिलिजस पॉलिसी ऑफ द मुघल एम्परर्स, पृ. १६९. हे फर्मान २८ फेब्रुवारी १६५९ या तारखेचे आहे. स्वधर्मावरील श्रद्धा आणि व्यावहारिक गरज यादोन्ही प्रेरणांचा प्रभाव उपर्युक्त फर्मानात दिसून येतो. काशी येथील विश्वनाथाचे देऊळ इ.स. १६६९ मध्ये औरंगजेबाच्या हुकमावरून पाडण्यात आले. (पहा-मआसिर-इ आलमगिरी, पृ.८८) मथुरा येथील केशवरायाचे देऊळ बीरसिंहदेव बुंदेला याने जहांगिराच्या कारकीर्दीत ३३ लाख रूपये खर्चून बांधले होते. ते इ.स. १६७० मध्ये औरंगजेबाच्या हुकमावरून पाहण्यात आले आणि त्यानंतर तिथे मशीद बांधण्यात आली. त्या देवळातील मूर्ती आग्र्याला आणण्यात आल्या आणि त्या नेहमी पायदळी तुडविल्या जाव्यात म्हणून बेगम साहिबा हिच्या मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरण्यात आल्या. मथुरेचे नाव बदलून इस्लामाबद असे ठेवण्यात आले. (या हकीगतीकरिता पहा - तत्रैव, पृ. ९५-९६)
अफजलखानानेही वरच्या चौलमधील सर्व हिंदूंची देवळे पाडण्याचा हुकूम दिला आहे, असा उल्लेख एका समकालीन पोर्तुगीज पत्रात आलेला आहे. अफजलपूर येथील त्याच्या शिलालेखात ‘‘कातिल-इ-मुतमर्रिदान व काफिरान,’’ म्हणजे बंडखोरांची व काफिरांची कत्तल करणारा, आणि ‘शिक्नन्दा-इ-बुतान,’’ म्हणजे मूर्ती फोडणारा, अशी विशेषणे त्याला लावलेली आहेत. त्वेळी देवळे फोडली असल्याचा उल्लेख शिवभारतात आणि शिवकाव्यातही आलेला आहे.
(शिवभारत, अध्याय. १९, श्लोक ४३; शिवकाव्य, सर्ग १२, श्लोक ७, ९. त्याच्या धर्मद्वेष्टेपणाकरिता शिवभारत, अध्याय १८, श्लोक १९-२४ ही पहा. तो देवळामध्ये रोज अनेक गाई मारीत असे आणि देवळे पाडून तेथील भक्तांना करवतीने कापीत असे, असे शिवकाव्यात म्हटले आहे. (पहा - सर्ग १२, श्लोक ८-९)
शिवाजी महाराजांच्या पदरीचे मुसलमान
शिवाजी महाराजांच्या सैन्यात केवळ ४ ते ५ मुसलमानच होते. शहाजीराजांच्या जहागिरीत सिद्दी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार, जैना खान पिरजादे सरहवालदार, बेहेलिम खान बारामतीचा हवालदार यांचा उल्लेख सापडतो. १६५८ साली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अधिकृत सुरुवात केली तेव्हा यामध्ये या कोणाचाही उल्लेख सापडत नाही. नूर खान बेग हा सरनोबत होता, असे म्हटले जाते पण तो देखील १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर येसाजी कंक हा पायदळाचा सरनौबत होता. पाचवं नाव सिद्धी हिलाल. तो विकत घेतलेला गुलाम होता, पण त्याला मुलाप्रमाणे घरात वाढवलेले होते. त्या काळामध्ये जो जन्माने हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हते. त्यामुळे महाराजांनी त्याला हिंदू करुन घेतले नाही. नेताजी पालकरच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. नेतोजी पालकर स्वत: जन्माने हिंदू होता. त्याला जबरदस्तीने बाटवले होते. त्यामुळे त्याला हिंदू करता आले. जो जन्माने हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हते. नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक दौलतखान आणि दुसरा दर्यासारंग. दर्यासारंगला १६७९ साली महाराजांनीच अटक केली. त्यावेळी आपल्याकडे नौदलाच्या बाबतीत अनुभवी अधिकारी नव्हते. म्हणून हा दौलतखान होता. महाराजांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळुक होते. यानंतर पुन्हा कधीही कुठल्या मुसलमान अधिकाऱ्याचा उल्लेख सापडत नाही. शिवरायांनी अफलजखानाचा जेव्हा वध केला तेव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. त्याचे नाव सिद्दी इब्राहिम. तो सुद्धा सिद्दी हिलाल सारखाच होता. मदारी मेहेतरचे नाव कागदोपत्री नाही, त्यामुळे त्याच्या अस्तित्त्वाला आधार नाही. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या मुसलमानांची नावे उपलब्ध नसली तरीही त्यांची संख्या १० च्या वर नसावीत, असा अंदाज आहे.

(संदर्भ : dasbodh.com
विभाग : छत्रपती शिवराय
विषय १२: श्री शिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन : शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे , पान नं. १ ते ३)
(श्रीराजाशिवछत्रपती - चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे, व्याख्यान स्थळ - श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदिर, पुणे, दि. १० जुलै २०१५)
उल्लेखनीय
महाराजांनी ज्याप्रमाणे मशिदी पाडून देवळे बांधली तशाचप्रकारे अशा आणखी २ गोष्टी त्यांच्या आयुष्यात आहेत. एकतर राजव्यवहारकोष.. म्हणजे मराठी भाषेत फारसी शब्द अर्थात यवनांच्या भाषेमुळे मराठी भाषा दूषित झाली होती, ती शुद्ध करण्याकरिता राजव्यवहारकोष रचण्यात आला. तिसरी गोष्ट म्हणजे नेतोजी पालकर. ज्यांनी ज्या जबरदस्तीने त्याला मुसलमान केले. त्यामुळे तितक्याच हट्टीपणाने महाराजांनी त्याला हिंदू केले. तुम्ही भाषा दूषित केली ती मी शुद्ध करणार, तुम्ही माणूस दूषित केलात, मी शुद्ध करणार, तुम्ही धर्मस्थान दूषित केलेत, मी ते शुद्ध करणार.. हा एकप्रकारचा चांगल्या अर्थाने हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता.
शिवरायांच्या समकालीन लोकांनी केलेल्या नोंदीचा तपशील :
महाराजांचे निकटवर्तीय कवींद्र परमानंदकृत यांचा शिवभारतातील उल्लेख :.
त्वया गृहित्वा कल्याणं तथा भीमपुरीमपी ।
यवनांना महासिद्धीनिलया: किल पातीत:।।
अर्थ : शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी काबीज करुन यवनांच्या मशिदी जमीनदोस्त केल्या (शि.भा.अ-१८/५२)
(संदर्भ : https://raigad.files.wordpress.com/2015/09/wpid-screenshot_2015-09-25-18-00-03-1.jpg)
* हिस्टोरिकल मिसेलनी मधील जेसुइट पत्रांमध्ये फादर हेरास यांचा वृत्तांत आहे. त्यामध्ये हिंदुस्तानातील यवनांचे बळ लक्षात घेऊन भविष्यात त्यांचा प्रतिकार कण्यासाठी बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आणि यवनांना राज्यातून शिवाजी महाराजांनी घालवून लावताना त्यांच्या मशिदींचा अपमान केला. (Desecration of Mosques) असा उल्लेख आहे. (हिस्टो. मिसेलनी - पृ.१३)
(https://raigad.files.wordpress.com/2015/09/wpid-screenshot_2015-09-25-18-00-03-1.jpg)

*इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रुवारी १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठविले. त्यात तो पत्राच्या सुरुवातीला महाराजांना उद्देशून लिहितो - "General of the Hindoo forces" (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), त्याकाळी देखील इंग्रजांची धारणा हीच होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत. (शि.प.सा.सं.ले-८०१)
(संदर्भ : dasbodh.com
विभाग : छत्रपती शिवराय
विषय १२: श्री शिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन : शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे , पान नं. ५)
(श्रीराजाशिवछत्रपती - चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे, व्याख्यान स्थळ - श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदिर, पुणे, दि. १० जुलै २०१५)
*कृष्णाजी अनंत सभासद यांनी आपल्या नोंदींमध्ये महाराजांबद्दल सुंदर लिहिले आहे ते लिहितात
- ‘‘या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा हा मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपती जाला. गोष्ट सामान्य न जाली’’
*शिवकालातील समकालीन कवी कविराज भूषण यांनी आपल्या शिवभूषण या काव्यमय ग्रंथामध्ये लिहिले आहे..
वेद राखे विदित, पुराण पर सिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधरमे,
हिन्दुअन की चोटि, रोटी राखी है सिपाहन की, कंधे में जनेव राख्यो, माला राखी गर में,
मिडी राखी मुगल, मरोडी राखे पातशाह, बैरी पीसी राखे, वरदान राखो कर में,
राजन की हद राखी तेग बल सिवराय, देव राखे देवल, स्वधर्म राख्यो घर में
अर्थ - शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर वेद, पुराण यांचे रक्षण केले, स्वसर्वस्वाचे सार असे राम-नाम हिंदूंच्या जिव्हेवर कायम ठेवले, हिंदूंची शेंडी राखली, शिपायांची उप-जीविका चालवली, खांद्यावरील जानवी आणि गळ्यातील माळा सुरक्षित ठेवली, मुघलांचे मर्दन केले, पादशहास मुरगळलं, शत्रुंचे चूर्ण केले, आपल्या लोकांना अभय दिले, देव-देवळांचे रक्षण केले आणि घराघरामध्ये स्वधर्म राखला.
(संदर्भ : शिवा - बावनी (सटीक) प्रकाशक हिन्दी-साहित्य-संमेलन प्रयाग पान क्र. ६१-६२) https://booksmotion.com/booksinfo/shiva-bavani-hindi-free-pdf-e105530.php
* मन कवी भूषण को सिव की भगति जिचो, सिव की भगति जिचो साधू जन सेवाने,
साधू जन जते या कठिन कलि काल, कलि काल महाबीर महाराज महि मेवाने,
जगत में जीतेमहाबीर महाराजनते, महाराज बावनहु पातशहा लेवाने,
पातशहा बावनु दिली के पातशहा जीती, पातशहा हिन्दुपति पातशहा सेवाने
अर्थ - ‘शिवाजी’ महाराजांना भूषणाने इथे ‘हिन्दूपति’ म्हटले आहे. भूषण म्हणतोय कवीच्या मनात शिव-भक्तीने, शिव भक्तीस साधू-जनांच्या सेवेने, साधू जनास कलि कालाने, कलि कालास शूर आणि कीर्तिवान राजाने आणि शूर आणि कीर्तिवान राजाने बावन्न बादशहास जिंकणाऱ्या औरंगजेबाने आणि त्या बावन्न बादशहांच्या बादशहास म्हणजे दिल्लीपति औरंगजेबास हिंदू पति ‘शिवाजीने’ जिंकले.
* कासी हू की कला गई मथुरा मस्जिद भई, गर सिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी
अर्थ - यवनांनी मंदिरे पाडून त्या जागी त्यांचा ध्वज फडकविला होता. जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होऊन ‘रब’ची चर्चा सुरु झाली. काशी कळाहीन झाली, मथुरेला मशीद उभी राहिली, अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर सर्व हिंदुंची सुन्ता झाली असती.
(संदर्भ : शिवा - बावनी (सटीक) प्रकाशक हिन्दी-साहित्य-संमेलन प्रयाग पान क्र. २५-२६) https://booksmotion.com/booksinfo/shiva-bavani-hindi-free-pdf-e105530.php
*शिवाजी महाराजांचे अमात्य म्हणून पदभार सांभाळणारे रामचंद्रपंत यांनी त्यांच्या आज्ञा पत्रामध्ये लिहिले आहे,
अवनी मंडळ निर्यावनी करावे, यवनाक्रांत राज्य आक्रमावे ।
यावरुन शिवाजी महाराजांची धारणा काय ती अगदी सरळ स्पष्ट होते.
संदर्भ : https://raigad.files.wordpress.com/2015/09/wpid-screenshot_2015-09-27-08-09-49-1.jpg
*छत्रपतींची सूरतेची स्वारी ही एका लुटारूची धाड होती. अफजलखानाची हत्या हा एक अवैध असा वध होता. जावळीच्या मोरे यांचा पाडाव ही राजनिती नव्हती, यात अजिबात तथ्य नाही.
महाराजांच्या जहांगिरीला भिडलेली जावळी जर पुंड्यपाळेकरांना आश्रय देणारी होती. स्वराज्य साधनेत व्यत्यय आणणारी होती. महाराजांना उचलून किंवा जायबंद करून विजापूरास आणतो, अशी प्रतिज्ञा करणाऱ्या खानाने आलिंगनाच्या निमित्ताने महाराजांचा गळा आवळून वरुन घाव घालण्याचा प्रयत्न केला असेल तर अशावेळी महाराजांनी जे काही केले ते चुकीचे केले म्हणणे योग्य ठरेल का ? सूरतेत साठवलेले आणि गोठवलेले धन महाराष्ट्राला ओरबाडून कोणी साठवले असेल आणि खंडणीच्या रूपाने परत करण्याची कोणी तयारी दाखविली नसेल तर गेले धन लुटून आणणे एवढा एकच उपाय महाराजांपुढे होता.
(संदर्भ : प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यान : https://www.youtube.com/watch?v=1UUmSQ7bVtY : कालावधी १२:२० ते १३:०१)

संदर्भ सूची :
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे
श्रीराजाशिवछत्रपती - चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे, व्याख्यान स्थळ - श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदिर, पुणे, दि. १० जुलै २०१५
शिवाजीराव भोसले व्याख्यान
dasbodh.com
विभाग : छत्रपती शिवराय
विषय १२: श्री शिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन : शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे
पाच पत्रे -
१)शिवछत्रपतींचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण
२) शिवछत्रपतींची लष्करास ताकीद
३) स्त्री वरील अत्याचार विरोधी पत्र
४) ‘हेनरी रेव्हिंगटन’ पत्र
५) मशीद इनामपत्र नामंजूरीचे पत्र
छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक दिना निमित्त म्हणजे हिंदू साम्राज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवशक ३५१ प्रारंभ
आपण लिहिलेला लेख अत्यंत प्रभावी आहे आणि अधिक चांगली माहिती मिळाली व ज्ञानात भर पडली त्याबददल आपले आभारी आहे.
अमित पुष्पलता विश्वनाथ मिटकरी
20 Jun 2024 19:56