
प्रोफेसर अंगस मेडिसन यांचा उल्लेख भारतीय ज्ञानाचा खजिना - भाग १ मध्ये आलेला आहे. प्रोफेसर मेडिसन (१९२६ - २०१०) हे मूळचे ब्रिटिश. मात्र पुढे जाऊन ते अनेक वर्ष नीदरलँडच्या ग्रोनिंगन विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रमुख होते. हे जगभर नावाजले जातात, ते त्यांच्या अर्थशास्त्राच्या इतिहासासंबंधीच्या संशोधनामुळे. अंगस मेडिसन यांनी अनेक वर्ष, अक्षरशः अथक परिश्रम करून जगाचा आर्थिक इतिहास तयार केला. त्यांच्या जगभर मान्यता असलेल्या अनेक पुस्तकांपैकी 'वर्ल्ड हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक्स' हे पुस्तक खूप गाजलं. यात त्यांनी आकडेवारीने, कोणत्या शतकात, जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत आणि व्यापारात, कोणते देश पुढे होते आणि कोणते मागे, याचे सविस्तर वर्णन केलेले आहे.
प्रोफेसर अंगस मेडिसन यांची आकडेवारी ही ख्रिस्त जन्मापासून सुरू होते. या आकडेवारीप्रमाणे पहिल्या शतकात, जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा हिस्सा हा ३३% पेक्षा जास्त होता. अर्थात, जगाच्या एकूण व्यापाराचा एक तृतीयांश व्यापार आपण करत होतो. पुढील हजार - दीड हजार वर्ष, जागतिक व्यापारातलं आपलं सर्वोच्च स्थान अबाधित होतं. मात्र मुस्लिम आक्रांतांनी केलेल्या अत्याचारांमुळे आणि नंतर इंग्रजांनी छिन्न-विछिन्न केलेल्या व्यवस्थांमुळे, जागतिक व्यापारातली आपली टक्केवारी घसरत गेली.
अर्थात, ख्रिस्त पूर्व काळापासून चा आढावा घेतला, तर साधारणतः दोन हजार ते अडीच हजार वर्ष आपण जागतिक व्यापारात निर्विवाद रूपाने सर्वोच्च स्थानी होतो. आपलं निर्यात जबरदस्त होतं. याचाच दुसरा अर्थ असा, की आपली जहाजं, भारतात तयार झालेला माल घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यात जात होती. व्यापार करत होती. आणि भारतात समृद्धी आणत होती ! मात्र तुम्हां - आम्हाला शाळेत काय शिकवलं - 'भारताचा शोध वास्को-डि-गामा ने सन १४९८ मध्ये लावला'. असा विकृत इतिहास आपण शिकलो, हे आपलं दुर्दैव..!
हजारो वर्षांपूर्वी आपण नौकानयन क्षेत्रात अत्यंत प्रगत होतो. त्या काळातील अत्याधुनिक जहाज आपण बांधायचो (तयार करायचो). आपण ही तयार केलेली जहाजं, इतर देशांना सुध्दा विकत होतो. समुद्रावरचं दिशाज्ञान आपल्याला फार चांगलं होतं. साधारण सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी, भारतीय दर्यावर्दी वापरत असलेला दिशादर्शक (मरीन कंपास) मिळालेला आहे. त्याला 'मच्छ यंत्र' म्हणायचे. तसेच दिशेची अचूकता मोडण्यासाठी, दोन बिंदूंमधला कोन काढण्याचं आधुनिक यंत्र सेक्सटेंट (Sextant), आपले दर्यावर्दी त्या काळात वापरायचे. त्या यंत्राचं नाव होतं 'वृत्तशंख भाग'.

एकूणात काय, तर व्यापाराच्या निमित्ताने आपल्या धाडसी व्यापाऱ्यांनी जगभर संचार केला. जगातील अनेक ठिकाणी सर्वप्रथम जाणारे भारतीय व्यापारी होते. प्राचीन भारताच्या व्यापारासंबंधी अनेकांनी लिहून ठेवलंय. त्यात पाश्चिमात्य प्रवासी प्रामुख्याने आहेत.
सिझर ऑगस्टस (ख्रिस्त पूर्व ६३ वे वर्ष - इसवी सन १४) या प्रसिद्ध राजाच्या काळात 'स्ट्रॉबो' हा ग्रीक इतिहासकार होऊन गेला. त्या काळात त्याने भरपूर प्रवास केला. त्याने लिहून ठेवलंय की 'सीझर ऑगस्टस' च्या काळात भारताचा रोमशी भरपूर व्यापार व्हायचा. त्या कालखंडात सुमारे १२० जहाजं दरवर्षी फक्त रोम साम्राज्यात, इजिप्त मार्गे जायची'.
इजिप्त मध्ये त्या काळात दोन प्रमुख बंदरं होती - मायोस हार्मोस (Myos Hormos) आणि बेरेनिके (Berenike / Berenice). यापैकी बेरेनिके चा उल्लेख 'भारतीय ज्ञानाचा खजिना - भाग १' मध्ये आलेला आहे. बेरेनिके हे इजिप्त चे प्राचीन बंदर. टोलेमी (द्वितीय) याने आईच्या स्मरणार्थ बांधलेले. साधारण नव्वद च्या दशकात येथे उत्खनन सुरू झाले. अनेक देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था मिळून हे उत्खनन करत आहेत. जगातील सर्व उत्खननांमध्ये हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. इथे अजूनही उत्खनन चालूच आहे.
साधारणतः वीस वर्षांपूर्वी या उत्खननात आठ किलो काळे मिरे, भारतीय बाटिक प्रिंट असलेली वस्त्रं, अशा बऱ्याच गोष्टी एका मोठ्या लाकडी पेटाऱ्यात सापडल्या होत्या. यामुळे भारताचा, युरोपशी व्यापार करण्याचा ‘मसाला मार्ग’ (Spice Route - समुद्री मार्ग) हा अधोरेखित झाला.
कोरोना नंतर सुरू केलेल्या उत्खननात, मार्च २०२२ मध्ये, बेरेनिके येथे त्यांना बुद्धाची एक मूर्ती मिळाली. आधुनिक तंत्राने त्या मूर्तीचे वय काढले असता ती सन ९० ते सन १४० (पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या मधली) या काळातली निघाली.
येथेच संस्कृत मध्ये लिहिलेला एक शिलालेख सापडला, जो तत्कालीन रोमन सम्राट 'फिलिप द अरब' (सन २०४ ते २४९. यात सम्राटपदाचा काळ आहे - २४४ ते २४९. अर्थात तिसरे शतक) ला उद्देशून आहे. तसेच येथे सातवाहनांच्या काळातली नाणी सापडली, जी दुसऱ्या शतकातली आहेत.
दक्षिण भारतात पुदुचेरी (जुने नाव पॉंडिचेरी) जवळ एक बंदर आहे, अरिकामेडू (Arikamedu). याचं प्राचीन नाव आहे पोदुके (Poduke). येथे नव्वद च्या दशकात उत्खननाला सुरुवात झाली आणि भारत - रोमन व्यापाराचे अनेक खणखणीत पुरावे मिळाले. रोमन शैलित बनलेले सोन्याचे मणी, काच सामान, दिवे आणि अगणित रोमन नाणी मिळाली. अरिकामेडू हे भारताच्या दक्षिण-पूर्व दिशेला आहे. याचा अर्थ येथूनही रोमन साम्राज्याशी व्यापार व्हायचा. भारतीय जहाजं, श्रीलंकेला वळसा घालून, हिंद महासागरात उतरायची आणि भर समुद्रात इजिप्त च्या दिशेने जायची.
भारत - रोमन व्यापाराचे अनेक पुरावे मिळाले आहेत, भारताच्या दक्षिण-पश्चिमेच्या बंदरांमधून. तुलनेने हा मार्ग लहान आणि सोपा होता. श्रीलंकेला वळसा घालून भारताच्या पूर्व तटावर जायची आवश्यकता नव्हती. यातील एक प्रमुख जागा आहे - पट्टनम. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील एक लहानसं गाव. कोचीन पासून २५ किलोमीटर उत्तरेला असलेलं.

सन २००७ ला जेव्हा येथे उत्खनन सुरू झालं, तेंव्हापासून भारत - रोमन व्यापाराचे अनेक पुरावे मिळू लागले. काही इतिहासकार, ही जागा म्हणजे प्राचीन काळचं मुझिरीस हे शहर आहे असं मानतात, तर काही इतिहासकार केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातल्या कोंडुगल्लूर या गावाला मुझिरीस समजतात. या मुझिरीसचं इतकं महत्त्व का ? तर रोमन साम्राज्याच्या काळात, अर्थात पहिल्या शतकात, लिहिलेल्या 'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' (एरिथ्रियन समुद्रातील भ्रमण) या पुस्तकात मुझिरीसचा, भारत - रोमन व्यापारात एक महत्त्वाचं केंद्र असल्याचा उल्लेख आहे. भारत - रोमन व्यापाराच्या मसाला मार्गावरील (Spice Route. समुद्री मार्ग) मुझिरीस हे एक महत्त्वाचं बंदर होतं.
महत्त्वाचे व्यापारिक व्यवहार लिहून काढण्यासाठी, पूर्वी इजिप्त मध्ये 'पेपिरस' (किंवा पपाईरस) नावाचा जाड कागद वापरला जायचा. केरळमध्ये दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीचा असेच काही पेपिरस सापडले आहेत, ज्यांना 'मुझिरीस पेपिरस' म्हणतात.
हे मुझिरीस पेपिरस म्हणजे अलेक्झांड्रियाला राहत असलेल्या एका रोमन - इजिप्शियन व्यापाऱ्याचा, भारताबरोबर केलेल्या व्यवसायाचा ताळेबंद आहे. त्या व्यापाऱ्याची एक बोट, मुझिरीस हून इटलीला यायची होती. त्या बोटीचे नाव होतं, हर्मापोलन (Harmapollon). या बोटीत काळे मिरे आणि इतर मसाले होते, जे हा व्यापारी भारतातून आयात करत होता. ह्या मालाची किंमत किती असेल..?
विल्यम डार्लिंपल सांगतात, 'त्या काळात इजिप्त मधले २४०० एकराचे, सर्वात चांगले शेत विकत घेता येईल किंवा इटली च्या मोठ्या शहरातली अगदी प्रमुख महत्त्वाची आणि विशाल अशी जागा सहज घेता येईल, एवढी किंमत त्या एका जहाजावरच्या मालाची होती !
फक्त एका जहाजामध्ये जर इतका बेशकिमती माल असेल, तर भारताचा किती मोठा व्यापार, त्या काळात रोमन साम्राज्याशी होत असेल ? एकट्या इजिप्तलाच भारताची मोठमोठी अशी सुमारे १२० जहाजं, भरगच्च माल भरून, वर्षभरात जात असत, असं स्ट्राबो या इतिहासकारानं लिहून ठेवलं आहे. पुढे या जहाजांची संख्या जवळपास दुप्पट झाली.
भारतातून येणाऱ्या मालावरच्या करातून, रोमला जितकी कमाई होत होती, ती त्यांच्या सरकारी तिजोरीच्या, अर्थात एकूण उत्पन्नाच्या, एक तृतीयांश होती..!
एकूणात काय, तर एकट्या रोमन साम्राज्याशीच भारत हा इतका प्रचंड व्यापार करत होता. मग इतर देशांशी केलेला व्यापार जोडला, तर भारताच्या समृद्धीची अंधुकशी कल्पना येऊ शकते.
फक्त दक्षिण भारतात रोमन साम्राज्याची ६,००० पेक्षा जास्त नाणी सापडली आहेत. ही नाणी सोन्याची किंवा चांदीची आहेत. मुख्यत्वे करून ही नाणी, सिझर ऑगस्टस आणि टिबेरूस (Tiberius) ह्या राजांच्या काळातली आहेत. अर्थात, इसवी सनापूर्वी १०० - १५० वर्षांपासून ते इसवी सन १०० पर्यंतची. गंमत म्हणजे, इटलीचा अपवाद सोडला, तर जगात सर्वात जास्त प्राचीन रोमन नाणी ही आपल्या भारतातच सापडली आहेत !
याच काळातला एक जबरदस्त पुरावा सापडलाय, इटलीच्या पोंपेई (Pompeii) या शहरात. नेपल्स शहराजवळ असलेल्या या शहराचं एक वैशिष्ट्य आहे. पहिल्या शतकात, सन ७९ मध्ये, गावा शेजारील माउंट वेसूविअस मध्ये ज्वालामुखीचा प्रचंड उद्रेक झाला आणि त्यातून निघालेल्या लाव्हारसात, हे शहर पूर्णपणे गाडल्या गेलं. पुढील अनेक वर्ष हे त्या लाव्हारसाच्या राखेतच १५ ते २० फूट आत दबलेलं राहिलं. याचा शोध लागला सोळाव्या शतकात. पण पुढे एकोणिसाव्या शतकात ह्याचं नीट उत्खनन सुरू झालं आणि १९६० पर्यंत हे अधिकांश शहर, नीटपणे बाहेर काढण्यात आलं होतं. इतकी वर्ष राखेच्या ढिगार्याखाली राहिल्याने, आतील वस्तू बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत राहिल्या.
या उत्खननात त्यांना एक देवीची मूर्ती सापडली. साधारण ख्रिस्त पूर्व २०० व्या वर्षी, (अर्थात आजपासून २२०० वर्षांपूर्वी) ही मूर्ती तयार झाली असावी. हस्तीदंतात तयार झालेली ही मूर्ती, पूर्णपणे भारतीय आहे. ऑक्टोबर १९३८ मध्ये ही देवीची प्रतिमा शोधली, Amedeo Maiuri या इटालियन पुरातत्त्ववेत्याने. प्रारंभी या मूर्तीला देवी लक्ष्मी समजले गेले. जगभर ही मूर्ती पोंपेई लक्ष्मी या नावाने प्रसिद्ध झाली. परंतु नंतर अध्ययनाने असे मानले गेले की ही प्रतिमा (मूर्ती), देवी लक्ष्मीची नसून एका यक्षिणीची आहे.

ही मूर्ती मथुरेला तयार झाली असावी असं एक मत आहे, तर दुसऱ्या मताच्या अनुसार जालना जिल्ह्यातील भोकरधन येथे ही मूर्ती घडविण्यात आली असावी. कारण अशाच प्रकारची मूर्ती तिथे सापडली आहे. या मूर्ती बरोबरच सातवाहन काळातील, राजा वशिष्ठीपुत्र पुलुमवी (पहिले शतक) यांचे नाणे सापडले, जे सातवाहनांच्या सागर व्यापाराचे प्रमाण आहे.
इटलीतील पोंपई लक्ष्मीची, ख्रिस्त पूर्व दोनशे वर्षांपूर्वीची मूर्ती हा तर भारत - रोमन साम्राज्यातील व्यापाराचा खणखणीत पुरावा आहेच, पण ह्याच मूर्तीच्या काळाच्या आसपास, भारत - रोमन व्यापाराचा अजून एक मजबूत पुरावा मिळालाय, भारतात, महाराष्ट्रात, आपल्या कोल्हापुरात..!
'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' ह्या प्राचीन प्रवास वर्णनात उल्लेख असल्यामुळे, कोल्हापूर शहराच्या पश्चिमेला, पंचगंगा नदीच्या तीरावर, सन १८७७ मध्ये सर्वप्रथम उत्खनन करण्यात आलं. पुढे सन १९४५ - १९४६ ला, डेक्कन कॉलेज पुणे तर्फे, पुरातत्त्ववेत्ता हंसमुख सांकलिया आणि मोरेश्वर दीक्षित यांच्या नेतृत्वात विस्तृत उत्खनन झालं. हा भाग 'ब्रह्मपुरी' नावाने ओळखला जातो. या उत्खननात त्यांना बऱ्याच गोष्टी सापडल्या. त्यात ग्रीको - रोमन बनावटीच्या अनेक वस्तू होत्या. शिवाय यात त्यांना 'पोसायडन' या ग्रीको - रोमन समुद्र देवतेची ब्रांझ ची मूर्ती सापडली. ही मूर्ती साधारण सात इंच उंच आहे. पहिल्या शतकात, ग्रीसच्या अलेक्झांड्रीया मध्ये ही मूर्ती घडविल्या गेली असावी. ब्रह्मपुरी च्या भागात, त्या काळात सातवाहनांचे राज्य होते. या प्रोसायडनच्या मूर्ती बरोबरच अनेक रोमन नाणी सापडली.
या सर्वांतून शास्त्रज्ञांनी हे अनुमान काढलं की या 'ब्रह्मपुरी' (आजचं कोल्हापूर) गावात, ग्रीक व्यापारांचा एक लहानसा तळ असावा. हे ग्रीक व्यापारी, त्यांच्या पोसायडन ह्या समुद्र देवतेला नेहमी बरोबर घेऊन प्रवास करत असत.

भारत आणि रोमन - ग्रीक या देशांमधील प्राचीन व्यापाराचा अजून किती स्पष्ट पुरावा हवा..?
'कोल्हापूर पोसायडन' ही मूर्ती अजून एक महत्त्वाची बाब समोर आणते. रोम आणि ग्रीस बरोबर व्यापारासाठी उपयोगात येणारा 'मसाला मार्ग' (स्पाइस रूट. समुद्री मार्ग) हा फक्त भारताच्या दक्षिण भागातल्या, विशेषतः केरळच्या बंदरांमध्ये सीमित नव्हता. तर कोकण आणि गुजरातेतूनही सरळ समुद्री मार्गाने युरोपियन देशांशी व्यापार केला जायचा.
सन २०२३ मध्ये भारतात G-20 चं समिट झालं. याचं अध्यक्षपद भारताने भूषवलं होतं. या समितीमध्ये एका आर्थिक कॉरिडोर ची कल्पना समोर आली. ही कल्पना संबंधित देशांबरोबरच इतरांनीही उचलून धरली. भारत - मध्यपूर्व - युरोप असा हा आर्थिक कॉरिडॉर (India - Middle East - Europe Economic Corridor - IMEEC) व्हायचा आहे.
भारताबद्दल भरपूर अध्ययन केलेल्या विल्यम डार्लिंपल ने या कल्पनेचं स्वागत केलं. त्यांचं म्हणणं असं की 'साधारण दोन हजार वर्षांपूर्वी हाच भारताचा खरा आणि महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता'. डार्लिंपल च्या म्हणण्याप्रमाणे, 'सिल्क रूट' ही तशी नवीन कल्पना आहे. 'सिल्क रूट' किंवा 'सिल्क रोड' ही संकल्पना सर्वप्रथम एकोणिसाव्या शतकात, जर्मन भूगोल शास्त्रज्ञ 'फार्मिनांद-बोन-रिश्टोफेन' याने मांडली. ती इंग्रजी साहित्यात आणि भाषेत, सन १९३० पासून आली. मात्र गेल्या वीस - पंचवीस वर्षात, खऱ्या अर्थानं हा शब्द लोकप्रिय झाला, रुळला.
वस्तुस्थिती ही आहे की त्या काळात, सर्वात जलद गतीचा, सर्वात स्वस्त आणि तुलनेने सर्वात सुरक्षित व्यापारी मार्ग हा 'मसाला मार्ग' होता, जो भर समुद्रातून जात होता.
पहिल्या शतकाच्या आसपास रोमन साम्राज्यातल्या 'प्लिनी द एल्डर' (गयुस प्लिनियस सेकुंडस. सन २३ ते ७९) याने भारतासह अनेक देशात भरपूर प्रवास केला त्याने लिहून ठेवलंय -
'या आमच्या रोमन स्त्रियांना झालाय तरी काय ? भारताच्या वस्त्रांची, त्यांच्या हिरे आणि माणकांनी बनविलेल्या दागिन्यांची त्यांना इतकी भुरळ का पडलीय ? या बायका, रोमन लोकरीची वस्त्र घालून संतुष्ट नाही राहू शकत का ? आणि यामुळे काय होतंय, भारताची निर्यात प्रचंड असल्याने, भारतीय मालाच्या बदल्यात आम्ही त्यांना भरमसाठ सोनं देत सुटलोय. आमचं सर्व सोनं भारतात जातंय..!'
आपल्या व्यापार करण्याच्या क्षमतेबद्दल प्लिनी सारख्या इतिहासकारांनी किती स्पष्ट लिहून ठेवलंय ! पण दुर्दैव म्हणजे, भारताचं जागतिक व्यापारात इतकं मजबूत आणि भक्कम स्थान होतं, हे आम्हाला कोणी शिकवलंच नाही..!
डार्लिंपल च्या अनुसार, युरोप बरोबर व्यापार करताना भारतीय फार काही महत्त्वाच्या किंवा महागाच्या वस्तू आयात करत नव्हते. ऑलिव्ह ऑइल, वाइन वगैरें सारख्या वस्तू आयात केल्या जायच्या. पण युरोपियन याच्या उलट होते. ते अत्यंत महाग वस्तू आयात करत होते. हिरे, माणकं, मोती, या सर्वांचे दागिने, मसाले, सुती वस्त्र, निळ... अर्थात या व्यापारात भारत नेहमीच जमेच्या बाजूला असायचा आणि युरोपियनांचं 'ट्रेड डेफिसिएट' असायचं. आणि म्हणूनच भारतात हजारोंनी प्राचीन रोमन नाणी सापडली आहेत.
'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रियन सी' या पुस्तकात 'भडोच' चा उल्लेख आहे. त्या काळात तिथे नहपान नावाचा शक राजा राज्य करत होता. भडोच मधून निळ, हस्तिदंत, सुती कापड, सुती वस्त्रं, रेशीम, मिरे, लॅपिस लझुली (रत्न) आणि इतर मौल्यवान खडे इत्यादी रोमला निर्यात होत असत.
महाराष्ट्रातील शूर्पारक (आत्ताचे नालासोपारा), कल्याण, चौल इत्यादी बंदरात ग्रीक जहाज येत असत, असा उल्लेख या पुस्तकात आहे.
प्रामुख्याने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून इजिप्त आणि युरोप बरोबर होणारा व्यापार आपण बघितला. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड समृद्धीचाही आपण आढावा घेतला.
मग भारताच्या पूर्व किनाऱ्यावरून चीन आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांशी होणाऱ्या व्यापाराचं काय..?
ते पुढील भागात.